बसफेऱ्या वाढवा : मजुरांसह प्रवाशांची मागणीजिमलगट्टा : गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपत आला असून या कामावर आलेले बाहेरगावचे मजूर गावाकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र दुर्गम भागात बसफेऱ्यांची कमतरता असल्याने अनेक मजुरांना बसअभावी अडकून पडावे लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाच वन विभागांतर्गत १२५ ते १५० च्या वर तेंदू युनिट विकल्या गेले होते. काही ठिकाणी कंत्राटदार, ग्रामपंचायती यांच्या मार्फत तेंदू संकलनाचे काम झाले. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने जिल्ह्यातील विविध भागातील मजूर तेंदू संकलनाच्या कामासाठी दुर्गम भागात १५ दिवस जाऊन राहतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातीलही मजूर येथे तेंदू संकलनासाठी येतात. यावर्षी तेंदू संकलनाचे काम २० मे नंतर बऱ्याच ठिकाणी आटोपले. जिमलगट्टा परिसरात ३१ मे रोजी तेंदू संकलन काम आटपून मजूर बाहेरगावी जाण्यासाठी निघाले. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या कमी असल्याने बऱ्याच मजुरांना मंगळवारी दिवसभर बसची प्रतीक्षा करावी लागली. त्यांना वेळेत बस न मिळाल्याने काही जणांनी खासगी गाड्यांचाही वापर परत जाण्यासाठी केला. आणखी दोन-तीन दिवस तेंदू मजुरांची ही गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने या भागात बसफेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी या मजुरांनी केली आहे. (वार्ताहर)
बसफेऱ्यांअभावी तेंदू मजूर दुर्गम भागातच अडकले
By admin | Published: June 02, 2016 2:58 AM