चंद्रपूर : गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आदी राज्यातील घरफोड्या करुन धुमाकूळ घालणा-या मोरक्याला तेलंगणाना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तो मूळचा वरोरा येथील रहिवासी आहे.मात्र त्याच्यावर वरोरा पोलीस ठाण्यात एकही गुन्ह्याची नोंद नसली तरी त्याच्या भावाच्या नावावर एक गुन्ह्याची नोंद आहे. चंदू हिरा बदखल (३२) रा. किल्ला वार्ड वरोरा असे अटकेतील मोरक्याचे नाव आहे.
मागील काही वर्षांपूर्वी चंदू बदखल वरोरा येथील किल्ला वार्डात राहत होता. त्यानंतर त्याने वरोरा शहर सोडून हिंगणघाटमध्ये आपले बस्तान मांडले. मात्र त्याचा भाऊ व आप्तेष्ठ वरोरा शहरात राहत असल्याने त्याचे नेहमी जाणे-येणे होते. चंदूने हिंगणघाटमध्ये घरफोडी करणारी टोळी तयार केली. त्यांच्या सहकार्याने तो गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आदी राज्यात मोठ्या घरफोड्या करीत होता. त्यामुळे त्यांच्या मागावर गुजरात, तेलंगणा व महाराष्ट्रातील पोलिसही होते.
दरम्यान, नुकतीच मंचेरियल पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाकी हिसका दाखवल्यानंतर घरफोडी केलेला ऐवज वरोरा शहरात आणून विक्री करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे मंचेरियल पोलिसांनी वरोरा येथे येऊन त्याच्याबाबतची पार्श्वभूमी जाणून घेतली.
त्याच्यावर वरोरा पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नसला तरी वरोरा शहरातील आझाद वार्डात मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीमध्ये त्यांच्या भावावर गुन्हा दाखल असून त्यामध्ये चंदूचा सहभाग असल्याच्या संशयावरुन वरोरा पोलिसही त्याच्या मार्गावर होते, अशी माहिती वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांनी ’लोकमतला’ दिली.