उद्घाटनाची प्रतीक्षा : कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वापर नाही लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाने १० घंटागाड्या आणल्या. सदर घंटागाड्या न. पं. कार्यालयात दाखल होऊन आता २५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र या घंटागाड्यांचे उद्घाटन झाले नाही. सदर घंटागाड्यांचा वापर कचरा उचलण्यासाठी केला जात नसून या घंटागाड्या तशाच पडून आहेत. सिरोंचा नगर पंचायत अस्तित्वात येऊन दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. मात्र या दोन वर्षाच्या काळात शहरवासीयांना कोणत्या सुविधा मिळाल्या नाही, कचरा टाकण्यासाठी कंटेनर ठेवण्यात आले नाही. कचऱ्याची उचल करून गावाबाहेर नेण्यासाठी साधन नाही. त्यामुळे जेकडे-तिकडे रस्त्याच्या कडेला तसेच रस्त्यावर कचरा अस्ताव्यस्त पडून राहतो. सांडपाणी वाहून जाण्याच्या मोरीत कचरा टाकण्यात येत आहे. परिणामी सिरोंचा शहरात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आणलेल्या घंटागाड्या नगर पंचायतीच्या आवारात तशाच पडून आहेत. या घंटागाडीत दोन कप्पे असून यामध्ये ओला व सुखा कचरा स्वतंत्रपणे टाकण्याची व्यवस्था आहे. सिरोंचा नगर पंचायतीचे सफाई कर्मचारी आठ ते दहा दिवसातून एकदा रस्त्याची साफसफाई करतात. तसेच जागोजागी कचऱ्याची ढीग करून आग लावून कचरा नष्ट करीत आहेत. या आगीमुळे परिसरात धूर पसरत असतो. परिणामी नजीकच्या लोकांना या धुराचा त्रास होतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरांना आग लागण्याची शक्यता असते. कचरा जाळताना घराला व गोठ्याला आग लागून नागरिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन घंटागाड्यांचा वापर कचऱ्याच्या विल्हेवाटेसाठी सुरू करावा, अशी मागणी सिरोंचा शहरवासीयांनी केली आहे.
सिरोंचातील दहा घंटागाड्या पडूनच
By admin | Published: May 21, 2017 1:27 AM