देसाईगंज पालिकेतील प्रकार : फेरनिविदा काढण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज येथील नगर पालिकेत एअर कंडिशनर व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी निविदेत बाजारभावापेक्षा चार ते पाचपट अधिक दर लावून वस्तू खरेदी करण्याची निविदा काढण्यात आली. या निविदेला मंजुरी मिळण्यासाठी २५ मे रोजी दुपारी २ वाजता देसाईगंजात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु काढण्यात आलेली निविदा नियमबाह्य असून फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणी काही माजी पदाधिकाऱ्यांसह देसाईगंजच्या भगतसिंग वॉर्डातील नागरिक कैैलास शंकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्षांनी १६ मे रोजी सर्वसाधारण सभेची नोटीस काढली. त्यानुसार २५ मे रोजी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभा पालिकेत होणार आहे. परंतु निविदेमध्ये वस्तूवर अधिक प्रमाणात दर दाखविण्यात आलेले आहेत. नगर पालिकेच्या निविदेनुसार नवीन एअर कंडिशनरची किंमत कमीत कमी १ लाख ५७ हजार ७०० रूपये दाखविली आहे. बाजारात या एसीची किंमत २६ हजार ते ३० हजार इतकी आहे. व्होल्टेज स्टॅबलायझर बाजारामध्ये ३ हजार ते ४ हजार ५०० रूपये किमतीत मिळतो. परंतु याची किंमत २२ हजार ५०० रूपये दाखविण्यात आली आहे. ए-४ साईजचा पेपर रिम बाजारात १३५ रूपयांपर्यंत मिळतो. परंतु त्याची किंमत ४७० रूपये दाखविण्यात आली आहे. वस्तू खरेदीकरिता निविदांचे टेंडर वर्तमानपत्रामध्ये दिले जाते. टेंडर नोटीस एका वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केली मात्र नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर निविदेबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली नाही. तसेच एकाच कंत्राटदाराला त्याच्याकडे व्यापार नसतानाही नेहमीच कंत्राट दिले जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. पालिकेने २५ मे च्या सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवलेली निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात यावी, तसेच या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. १० दिवसांपूर्वीच लावले दोन एसीनिविदा सभेत मंजूर होण्यापूर्वी नगराध्यक्षांच्या हॉलमध्ये दोन नवीन एसी १० दिवसांंपूर्वीच लावण्यात आले आहेत. सदर काम नियमबाह्य झाले असून या वस्तू खरेदीत अधिक प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे म्हटले जाते. भगतसिंग वॉर्डात पाण्याची टंचाई आहे. नैनपूर येथील हातपंपही बंद आहे. या समस्यांसंदर्भात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, मात्र पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ब्रँंडेड वस्तू खरेदी करीत असल्यामुळे वस्तूंची किंमत अधिक आहे. सदर वस्तू त्यांच्या दर्जानुरूप बाजारभावानुसार आहेत. त्यामुळे एसी व अन्य वस्तू खरेदी करताना कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त दर लावण्यात आलेला नाही. निविदा संदर्भात करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत.- तैमूर मुलानी, मुख्याधिकारी, नगर परिषद, देसाईगंज.
अधिक दराने वस्तू खरेदीची निविदा
By admin | Published: May 25, 2017 12:43 AM