पेरमिली : अहेरी तालुक्याच्या पेरमिली परिसरात काही गावांमध्ये करारनामा न करताच तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. त्यामुळे अनेक मजुरांची मजुरी बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत मेडपल्ली, आरेंदा, येरमनार, पेरमिली, पल्ले, कुरूमपल्ली आदी सहा ग्रा.पं.चा समावेश आहे. पेरमिली वगळता पाच ग्रा.पं.मध्ये तेंदूपत्ता संकलन ग्रामसभेमार्फत सुरू आहे. परंतु ग्रामसभा व कंत्राटदार परस्पर चर्चा करून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. परिसरातील तेंदू हंगाम संपला असतानाही काही ग्रा.पं. व कंत्राटदार करारनामा न करता तेंदुसंकलन करीत आहेत. काही ग्रा.पं.ने वनविभागाकडून सविस्तर प्रक्रिया पार पाडली नाही. एकाही मजुरांचा पुडा ए-१ बुकवर नाेंदविला नाही. त्यामुळे मजुरांचे लाखाे रुपये डुबण्याची शक्यता आहे. संबंधित ग्रामसभा व कंत्राटदारांची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.