दिगांबर जवादे
गडचिराेली : जिल्ह्यातील तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला असल्याने हा तेंदूपत्ता खरेदी करण्यासाठी देशभरातील कंत्राटदारांमध्ये माेठी स्पर्धा निर्माण हाेते. यावर्षी तेंदूपत्त्याच्या १०० पुड्यांना १ हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तेंदूपत्ता मजूर दर दिवशी किमान ३०० पुडे बांधत असून दिवसाला तीन हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करीत आहेत.
मागील तीन वर्षांपासून तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. अधिकाधिक भाव मिळावा, यासाठी ग्रामसभा वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन तेंदूपत्त्याचा लिलाव करतात. लिलावाच्या वेळी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण हाेते. चांगल्या दर्जाच्या तेंदूपत्त्याला राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेत चांगली मागणी व भाव मिळत असल्याने व्यापारी गडचिराेली जिल्ह्यातील तेंदूपत्त्याला अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी बहुतांश ग्रामसभांचा तेंदूपत्ता शेकडा १ हजार १०० ते १ हजार २०० रुपयांना विकण्यात आला आहे.
१० दिवसांत कुटुंब बनते लखपती
एका तेंदूपत्त्याच्या पुढ्यात ७० पाने राहतात. एका दिवशी एक मजूर कमीत कमी ३०० पुढे बांधतात. शेकडा एक हजार रुपये जरी पकडला तरी दिवसाला किमान तीन हजार रुपये कमाई हाेते. तेंदूपत्ता संकलन आठ ते दहा दिवस केले जाते. या दहा दिवसांत प्रत्येक कुटुंब एक लाख रुपयांच्या वर कमाई करीत असल्याने येथील मजूर या हंगामाची आतुरतेने वाट पाहत राहतात.
९० टक्के रक्कम मजुरांवरच खर्च
कंत्राटदाराने ठरविलेल्या दरापैकी जवळपास ९० टक्के रक्कम मजुरी म्हणून दिली जाते. केवळ १० टक्के रक्कम ग्रामसभा स्वत:कडे ठेवते. १ हजार १०० रुपये शेकडा भाव ठरला असेल तर १ हजार रुपये प्रति शेकडा भाव मजुरी म्हणून दिली जाते. यातील निम्मी मजुरी नगदी स्वरुपात, तर उर्वरित मजुरी बाेनसच्या रुपात दाेन ते तीन महिन्यांनी दिली जाते.
३०० काेटींची उलाढाल
आठ दिवस चालणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायातून जिल्ह्यात जवळपास ३०० काेटी रुपयांची उलाढाल हाेते. ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिल्याने वन विभागाचे महत्त्व कमी झाले आहे. ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत.