गडचिरोली : शहरातील कृषी कार्यालयाच्या परिसरात २० मार्चला दुपारी सव्वा बारा वाजता एक वाघीण आढळून आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली असून वनविभागाकडून सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरु आहे.
शहरातील चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौकाजवळील कृषी महाविद्यालयासमोर कृषी विज्ञान केंद्र असून तेथे रोपवाटिका आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुपारी सव्वा बारा वाजता कृषी महाविद्यालयाकडून धावत आलेली वाघीण चंद्रपूर रोड ओलांडून कृषी विज्ञान केंद्र कार्यालयाच्या आवारात शिरली. या वाघिणीला कार्यालयाच्या आवारात जाताना काही नागरिकांनी पाहिले. त्यानंतर रोपवाटिकेत ती नजरेआड झाली. सहायक वनसंरक्षक सोनल भडके, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, गडचिरोली ठाण्याचे पो.नि. अरविंदकुमार कतलाम यांनी धाव घेतली.
कार्यालयाला छावणीचे स्वरुप
दरम्यान, चंद्रपूर रस्त्यावरुन ये- जा करणारे नागरिक वाघिणीला पाहण्यासाठी थांबत होते, सुरक्षेची खबरदारी म्हणून कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले असून नागरिकांना तेथे थांबू दिले जात नव्हते. कार्यालयाच्या संपूर्ण परिसराला पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. वनविभागाचे अधिकारी व पोलिसांमुळे या कार्यालयाला छावणीचे स्वरुप आले होते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजही विस्कळीत झाले होते.
चंद्रपूरहून मागविली रेस्क्यू टीम
या वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा मागवला. शिवाय चंद्रपूरहून रेस्क्यू टीम पाचारण केली आहे. ही टीम आल्यानंतर वाघिणीला पकडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाघीण गर्भवती असल्याचा अंदाज
कृषी विज्ञान केंद्र कार्यालयाच्या आवारात शिरलेली वाघिणीचे नाव जीएल ९ असे आहे. ती गर्भवती असल्याचा अंदाज आहे. सेमना जंगलात आठवडाभरापूर्वी तिचे लोकेशन आढळले होते. तिला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून वनविभाग व पोलिस अधिकारी तळ ठोकून होते.