गडचिराेली : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. गडचिराेली जिल्ह्यात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची सुविधा प्रभावी नाही. शाळा, संस्था व प्रशासनाकडे अद्यावत तांत्रिक सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्यास बऱ्याच अडचणी येऊ शेतात. त्यामुळे गडचिराेलीसारख्या मागास जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाॅईनच घ्याव्या, अशी इच्छा जिल्ह्यातील पालकांनी लाेकमतकडे व्यक्त केली.
विदर्भासह महाराष्ट्र राज्यात काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्याची लाट हळूहळू सुरू झाली आहे. मात्र पूर्व विदर्भातील गडचिराेली, चंद्रपूर या जिल्ह्यात काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण माेठ्या संख्येने नाहीत. त्यामुळे येथे ऑफलाईन परीक्षा घेण्यास काही हरकत नाही. काेविडचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष केंद्रावर ऑफलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांनाही साेयीचे जाईल. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे ऑफलाईनच पर्याय चांगला आहे.
गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या जि.प.च्या दहा माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. मुलेचरा तालुक्यात बंगालीभाषिक व माडीया भाषिक विद्यार्थी व पालक आहेत. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्तरपत्रिका साेडविण्याची सवय आहे. गाेंडवाना विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी प्रचंड गाेंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी लाखाे रुपये खर्च करून विशिष्ट ॲप खरेदी करून परीक्षा ऑनलाईनरित्या यशस्वी पार पाडण्यात आली.
काेट....
दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
गाेंडवाना विद्यापीठाकडे स्वतंत्र ॲपची व्यवस्था असल्याने त्यांनी घेतलेली ऑनलाईन परीक्षा यशस्वी झाली. शिक्षण विभाग, शाळा व संस्थांकडे पुरेशा प्रमाणात तांत्रिक सुविधा नाही. शिवाय दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची माेठी समस्या आहे.
- देविदास डाेंगरे, पालक
———————-
अहेरी उपविभागात शासनाच्या वतीने दूरसंचार सेवेचे टाॅवर उभारण्यात आले. मात्र इंटरनेटची गती राहत नाही. त्यामुळे या भागात इयत्ता दहावीची ऑनलाईन परीक्षा घेण शक्य हाेणार नाही. बऱ्याच तांत्रिक अडचणी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ शकते.
- विजय साेनकुसरे, पालक
———————-
माझी मुलगी पहिल्या वर्गापासून नववीपर्यंत ऑफलाईन परीक्षा देत आहे. काेराेनामुळे माेबाईलवर गृहपाठ करीत आहे. मात्र बऱ्याचदा कव्हरेज राहत नसल्याने ऑनलाईन शिक्षणात अडचणी आल्या. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने परीक्षाही केंद्रांवर व्हाव्या.
- अल्का गेडाम, पालक
काेट...
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
काेराेना संसर्गामुळे खबरदारी म्हणून गेल्या पाच-सहा महिने माेबाइलच्या सहाय्याने ऑनलाईन शिक्षण घेण्याचा मुला-मुलींनी प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन व ऑनलाईनरित्या हाेणारे अध्ययन, अध्यापन यात बरीच तफावत आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच व्हावी.
- रवींद्र टिंगुसले, पालक
——————————
काेराेना महामारीच्या समस्येमुळे माझ्या मुलीस बरेच विद्यार्थी अभ्यासात मागे पडले. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाला वेग आला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास हरकत नाही. मात्र तेवढी परिपूर्ण व्यवस्था शिक्षण विभागाने करावी. पाल्यांचे नुकसान सहन करणार नाही.
- बंडूजी लाेनबले, पालक
————————————
अंकिसा व झिंगानूर भागात कव्हरेज राहत नसल्याने फाेन लागत नाही. इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा प्रश्न गंभीर आहे. या भागात ऑफलाईन परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना अपयशाकडे घेऊन जाणे, असाच प्रकार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची सवय नाही.
- प्राजक्ता शेंडे, पालक