लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : शंकरनगर परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन घडले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शंकरनगर येथील शेतकरी जोगेंंद्र मुजूमदार हे ५ जानेवारी रोजी रात्री मका व कारले पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतातील मचाणावर बसले होते. रात्री ९ वाजताच्या दरम्यान वाघ त्यांच्या मचानीच्या खाली येऊन बसला. डरकाळी फोडण्यास सुरूवात केली. वाघाच्या डरकाळी ऐकून जोगेंद्र मुजूमदार यांची पाचावर धारण बसली. जीव मुठीत घेऊन मुजूमदार यांनी गावातील नागरिकांना फोनवरून माहिती दिली. गावातील ४० ते ५० नागरिकांनी शेतात जाऊन आरडाओरड केली. त्यानंतर वाघ शेतातून निघून गेला. शंकरनगर परिसरात मका व कारले पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या परिसरात पाणी व भरपूर हिरवागार चारा असल्याने तृणभक्ष्य प्राणी शेतात येतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पिकांचे राखण रात्रंदिवस करावे लागते. राखण न केल्यास संपूर्ण पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका राहते. त्यामुळे शंकरनगर परिसरातील शेतकरी जीव धोक्यात घालून शेतांची राखण करीत आहेत.वन विभागाने सदर वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शंकरनगर येथील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
शंकरनगरात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:09 PM
शंकरनगर परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन घडले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठळक मुद्दे मचाणाखाली ठाण मांडले : फोनवरून गावकऱ्यांना दिली माहिती