गडचिराेली : शिक्षक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यापासून यंदा परीक्षा परिषदेने डी.एड. व बी.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दूर ठेवले हाेते. याबाबत अंतिम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात हाेती. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता डी.एड. व बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे.
डी.एड. व बी.एड. अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सन २०११ पासून शिक्षक भरती बंद असल्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेक विद्यार्थी शिक्षकाच्या नाेकरीपासून वंचित राहिले आहेत. त्यातच २०१७ पासून पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सुरू झालेली भरती प्रक्रिया अर्ध्यावर थांबली आहे. शासनाच्या वतीने गेल्या दाेन वर्षांपासून टीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १० ऑक्टाेबर राेजी टीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काेराेनाच्या तणावग्रस्त काळात डी.एड. व बी.एड. अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्रता परीक्षेपासून वंचित राहिले. या विराेधात शेकडाे विद्यार्थ्यांनी आवाज उठविला. त्यानंतर शासनाने दखल घेतली. शासनाच्या निर्णयानुसार आता डी.एड. व बी.एड.च्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यात डी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - २२
बी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ५८
बाॅक्स....
५ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
१० ऑक्टाेबर राेजी हाेऊ घातलेल्या टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांना ३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत हाेती. मात्र यंदा डी.एड. व बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकर लागण्याची शक्यता कमी हाेती. त्यामुळे बरेच विद्यार्थी टीईटीचे अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, याकरिता परीक्षा परिषदेने आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
काेट...
विद्यार्थी म्हणतात...
मी डी.एड.च्या अंतिम वर्षाला असून टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ मिळाली आहे. आम्हाला अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे टीईटी देण्याची संधी शासनाच्या निर्णयातून प्राप्त झाली आहे.
- संकेत मेश्राम
..............
गेल्या दाेन वर्षांपासून टीईटी परीक्षा झाली नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी शिक्षक भरतीपासून वंचित राहिले. आता टीईटी परीक्षा देण्याची संधी मिळत आहे.
- प्रणिता जाधव
काेट...
गडचिराेली जिल्ह्यात सध्या दाेन डी.एड. व दाेन बी.एड. काॅलेज सुरू आहेत. यामध्ये आरमाेरी, गडचिराेली व मुरखळा येथील काॅलेजचा समावेश आहे. डी.एड. प्रवेशाच्या पडताळणीसाठी आतापर्यंत ४७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
- शरदचंद्र पाटील, प्राचार्य, डायट