शेकडो वर्षांपासून परंपरा कायम : सुरजागड डोंगरावर चढून केली जाते पूजा; देवाला घातले जातात साकडेरवी रामगुंडेवार एटापल्लीतालुक्यातील सुरजागड गावात दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवशीय महोत्सव होते. महोत्सवादरम्यान यात्रा भरते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शेकडो आदिवासी बांधव आदिवासींचे आराध्य दैवत असलेल्या ठाकूरदेवाची सात किमी उंच डोंगर चढून पूजा-अर्चा करतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून कायम असून यावर्षी तब्बल २०० वर आदिवासी, गैरआदिवासी भाविकांनी सात किमी डोंगर चढून मनोभावे ठाकूरदेवाची पूजा केली.यात्रेदरम्यान सुरजागड गावाजवळ गोटूल ठाकूरदेवाचे मंदिर असून या ठाकूरदेवाची पूजा करून यात्रेस प्रारंभ होतो. या मंदिरात आदिवासी बांधव एकत्र येतात. पारंपरिक आदिवासी वाद्यांनी मंदिराजवळ अनेकजण आल्यावर त्यांच्या अंगात देव येते, अशी समज करून अंगावरील कपडे काढून ते नृत्य करतात. अर्धा-एक तास नृत्य केल्यानंतर सुरजागड परिसरातील अनेक गावातील प्रमुख व्यक्ती भूमीया, पोलीस पाटील, पुजारी हे सात किमी उंचीवरील पहाडीवर चढण्यास सुरूवात करतात. सदर पहाडीवर चढणे म्हणजे, तारेवरची कसरत आहे. मात्र श्रध्दपोटी या अडचणींचा कोणीच विचार करीत नाही. अर्धा किमी अंतर चढल्यावर एका जागेवरून पूजा करून कोंबड्याचा बळी दिला जातो. त्यानंतर पुन्हा वर चढण्यास सुरूवात होते. दोन किमी अंतरावर पुन्हा पूजा करून डुकराचा बळी दिला जातो. त्यानंतर एक किमी अंतर चढल्यावर तिसरी पूजा करून बकऱ्याचा बळी चढविला जातो. त्यानंतर सर्वात उंच पहाडीवर चढून पूजा केली जाते. पहिली पूजा झाल्यानंतर दोन किमी अंतरावर दुसरी पूजा होते. येथून महिलांना वर पहाडीवर चढण्यास मनाई आहे. महिला इथपर्यंत पोहोचल्यावर परत जातात. या ठिकाणी चप्पल लावून चढण्यासही मनाई आहे. याच ठिकाणी चप्पल, जोडे काढून ठेवण्यास सांगण्यात येते. तब्बल पाच किमी अंतर विना चपलांनी दगडातून पहाडीवर चढावे लागते. मात्र चपलाविना खाली उतरताना दगड पायाला चांगलेच रूततात. शेकडो वर्षापासून पहाडीवर चढून पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे. पुर्वी ठराविक आठ ते दहा जण पहाडीवर चढत असायचे. मात्र आता दरवर्षी पहाडीवर चढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नुकत्याच पार पडलेल्या या उत्सवादरम्यान २०० पेक्षा अधिक आदिवासी, गैरआदिवासी भाविकांनी पहाडीवर चढून पूजा केली. यात एटापल्ली, धानोरा, चामोर्शी, कुरखेडा येथील भाविक सहभागी होते.मनमोहक दृश्य : सुरजागड पहाडीवर चढल्यानंतर मनमोहक दृश्य बघितल्यावर भाविकांचा सर्व प्रकारचा थकवा दूर होतो. चारही बाजूंनी घनदाट जंगल, धुक्याने नटलेले सौंदर्य, लोहखनिजाचे मोठमोठे दगड असे मनमोहक दृश्य बघण्यासारखे आहे.यंदा सैनू गोटा यांना पूजेचा मानगट्टा येथील आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा यांना प्रथम पुजेचा मान मिळाला. त्यांनी बकऱ्याचे बलिदान देऊन पूजा-अर्चा केली. पहाडीवर अनेक मातीचे दगड आहेत. याच ठिकाणी पूजा करून झेंडा फडकविल्या जाते. ‘वर्षभर भरभरून उत्पन्न दे, या पहाडीचे रक्षण कर’ असे साकडे ठाकूरदेवाला घातले जाते. सदर पहाडीवर वीर बाबुराव शेडमाके यांचे वास्तव्य होते, असे सांगण्यात येते. पहाडीवर चढताना अनेक ठिकाणी दगडांनी बांधलेली सुरक्षा भिंत आहे.
ठाकूरदेवाच्या श्रद्धेपोटी भाविकांची सात किमींची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2017 12:49 AM