बॉर्डरवरची 'ती' रात्र ठरली सर्वात कठीण; युक्रेनवरून परतलेल्या श्रुतीने सांगितली व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 02:45 PM2022-03-04T14:45:45+5:302022-03-04T14:52:33+5:30
स्मृती सुखरूप गडचिरोलीत पोहोचली असली तरी इतर दोन मुलींना अजूनही तेथून बाहेर पडणे शक्य झालेले नाही.
गडचिरोली : एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन गाठलेल्या गडचिरोलीतील तीन पैकी एक विद्यार्थिनी स्मृती रमेश सोनटक्के ही बुधवारी संध्याकाळी गडचिरोलीत सुखरूप पोहोचली.
गेल्या आठवडाभरापासून अतिशय विपरित परिस्थितीत दिवस काढणाऱ्या स्मृतीने युद्धजन्य परिस्थितीत भारतात परतण्यासाठी युक्रेनच्या बॉर्डरवर काढलेली रात्र तिच्यासाठी सर्वाधिक परीक्षा पाहणारी होती. गेल्या २४ फेब्रुवारीला रशियाने युद्ध लादलेल्या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी अडकून पडले. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील तीन मुलींचाही समावेश आहे. त्यातील स्मृती सुखरूप गडचिरोलीत पोहोचली असली तरी इतर दोन मुलींना अजूनही तेथून बाहेर पडणे शक्य झालेले नाही.
कडक थंडीमुळे आणि सतत बर्फवृष्टी होत असताना स्मृती इतर विद्यार्थ्यांसोबत भारतात परतण्याची आस लावून युक्रेनच्या सीमेवर पोहोचली होती. पण पुढील प्रवासाची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत तिला रात्रभर थंडीत राहावे लागले. मुलीची ती अवस्था पाहून तिला विनाकारण तर परत बोलवत नाही ना, त्यापेक्षा ती हॉस्टेलमध्येच सुरक्षित होती, असा विचार मनात डोकावत होता, अशी प्रतिक्रिया स्मृतीची आई ज्योती सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
माझी मुलगी तर देशात आणि आमच्यापर्यंत पोहोचली. आज ती आमच्या डोळ्यासमोर असल्याचे पाहून खूप समाधान वाटते. पण तिच्यासारख्या इतरही मुला-मुलींना सरकारने लवकर सुखरूप परत आणावे. तेथील परिस्थिती पाहून वाईट वाटते, असे त्या म्हणाल्या.