लाेकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी येथील प्राणहिता पाेलीस मुख्यालयात तैनात असलेल्या सीआरपीएफ ३७ बटालियनचा ५४ वा स्थापना दिवस कमांडंट एम. एच. खोब्रागडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी कमांडंट यांनी जवानांना या बटालियनच्या इतिहासाची माहिती दिली. सीआरपीएफ ३७ बटालियनची स्थापना ५४ वर्षांपूर्वी १ जुलै १९६८ रोजी देवळी (राजस्थान) येथे झाली. यानंतर, या बटालियनने राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा आणि महाराष्ट्र अशा देशाच्या विविध भागात तैनातीदरम्यान आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले. ६ जानेवारी २०१२ पासून बटालियन महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत आहे. ३७ बटालियनने अनेक आव्हाने पेलली आहेत. ही आव्हाने अजूनही संपलेली नाहीत. पुढे नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी बळाची शिकवण, स्वयंशिस्त, संयम आणि समर्पणाची भावना सर्वोच्च ठेवावी लागेल, असे मार्गदर्शन केले. यावेळी ३७ बटालियनचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे, ९ बटालियनचे कमांडंट आर. एस. बालापूरकर,१९२ बटालियनचे कमांडंट देवराज, द्वितीय कमांडिंग ऑफिसर मनमदन किशनन, रामरस मीना आणि बिमल राज, डेप्युटी कमांडंट रमेश सिंग, सहायक कमांडंट तरुण डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. संपत कुमार, अरविंद सातोरे, सुभेदार मेजर फुलचंद, अधिनस्त अधिकारी व जवान व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद वीरांना श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कमांडंट ३७ बटालियनच्या क्वार्टर गार्डवर मानवंदना देण्यात आली. सैनिकी परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.