गडचिरोली : शहराच्या गाेकुलनगरातील देवापूर रिठ सर्वे नंबर ७८ व ८८ येथील तलावातील अतिक्रमीत एकतानगर झोपडपट्टीबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू आहे. अतिक्रमणधारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयात रिठ याचिका दाखल केली असून याबाबतच्या सुनावण्या सुरू आहेत. दरम्यान नगर परिषद प्रशासनाने तगड्या बंदोबस्तात २१ जुन राेजी बुधवारला सकाळच्या सुमारास सदर झोपडपट्टीवर बुलडोजर चालविला.
दरम्यान जेसीबी, पोकलॅन्ड, ट्रॅक्टर, अग्निशमन दल तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसह पाोलिस बंदोबस्त व प्रशासनाचा प्रचंड फौजफाटा येथे दाखल झाला. येथील झोपड्या बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. दरम्यान कवेलू, फाटे व इतर साहित्यांची नासधूस झाली. काही अतिक्रमणधारकांनी कसेबसे आपले संसारपयोगी साहित्य बाहेर काढले. तर काही जणांना असे साहित्य काढण्याची संधीही मिळाली नाही.
सदर कारवाईदरम्यान प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह नगर पालिकेचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कारवाई सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व अतिक्रमणधारकांनी मोहिमेचा विरोध केला. गरिबांच्या झोपड्या पाडू नका, साहित्यांची नासधूस करू नका, अशी विनवनी केली. मात्र, प्रशासनाने कठोर भूमिका घेत सदर तलावातील अतिक्रमण पूर्णपणे काढले.
८० पेक्षा अधिकजण पोलिसांच्या नजरकैदेत
अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या तसेच अडचण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तसेच अतिक्रमणधारक मिळून ८० पेक्षा अधिक नागरिकांना पोलिस मुख्यालयाच्या परिसरात नजरकैदेत ठेवले. सकाळी १० : ३० वाजतापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत अतिक्रमणधारक व आंदोलक पोलिसांच्या नजरकैदेत होते.