दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गौरीगणपती सणासाठी दिला जाणारा आनंदाचा शिधा अजूनपर्यंत लाभार्थ्यांना उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये पुरवठा विभागाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. ज्या सणाच्या निमित्ताने शिधा दिला जातो तो त्या कालावधीतच देण्यात यावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
वर्षभरात विविध सणउत्सव साजरे केले जातात. या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य शासनामार्फत रेशन दुकानातून काही निवडक सणांसाठी १०० रुपयांमध्ये काही निवडक जिन्नस दिले जात आहेत. नागरिकांना सदर जिन्नस कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने त्याची प्रतीक्षा करीत असतात. ज्या सणासाठी आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आला आहे. त्याच सणाच्या काही दिवसांपूर्वी त्याचे वितरण होणे आवश्यक आहे. तेव्हाच त्याचे महत्त्व राहते. मात्र बऱ्याचवेळा सण संपल्यावर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळत आहे. कोणता सण कोणत्या तारखेला आहे. ही बाब पुरवठा विभागाला माहीत असते. त्यानुसार त्या सणाच्या काही दिवसांपूर्वी शिधा पोहोचेल याचे नियोजन संबंधित विभागाने करणे आवश्यक असते. मात्र नियोजन केले जात नसल्याने सणाच्या पहिले आनंदाचा शिधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
केवळ रवा पोहोचला लाभार्थ्यांना वितरित केला जाणारे धान्य सर्वप्रथम तालुकास्तरावरील गोदामात साठवले जाते. त्यानंतर त्याचे वितरण रेशन दुकानांमध्ये केले जाते. तालुक्याच्या गोदामात केवळ रवा पोहोचला आहे. उर्वरित जिन्नस तर मिळालेच नाही. ते कधी मिळणार हे पुरवठा विभागही सांगण्यास तयार नाहीत. केवळ शासनाकडून आपल्याला जिल्ह्यात शिधा मिळाला नाही, असे उत्तर देऊन पुरवठा विभागाचे अधिकारी मोकळे होतात.
कोणकोणते जिन्नस मिळणार?
- चार प्रकारचे जिन्नस असलेला आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर यांचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ रवा प्राप्त झाला आहे.
- उर्वरित जिन्नस प्राप्त झाले नाहीत. गौरीचा सण तर आता संपला आहे. गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. तेही तीन, पाच व दहा दिवसांनी उठतील. त्यानंतर तर जर शिधा मिळाला तर या शिध्याचा अर्थ काय? असा प्रश्न आहे.
पुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार गडचिरोली जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा अनुभव येथील नागरिकांना अनेकवेळा आला आहे. रेशनचे धान्य लाभार्थ्यांना कधीच वेळेवर मिळत नाही. घरचे धान्य संपल्याने गरीब नागरिकांना खासगी दुकानातून धान्य खरेदी करावे लागते. त्यासाठी मजुरीचे पैसे खर्च होतात. परिणामी नियोजन बिघडते.
"ज्या सणाच्या नावाने आनंदाचा शिधा जाहीर केला आहे. तो त्या सणाच्या पूर्वी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तो वेळेवर मिळत नाही. परिणामी लाभार्थी नाराज होतात. सणाच्या पूर्वी शिधा मिळेल यासाठी पुरवठा विभागाने नियोजन करावे."- अनिल भांडेकर, रेशन दुकानदार
"पुरवठा विभाग शिधा व धान्य उपलब्ध करून देत नाही. लाभार्थ्यांच्या रोषाला मात्र रेशन दुकानदारांना बळी पडावे लागते. धान्यासाठी येणारे लाभार्थी आनंदाच्या शिधासाठी विचारत आहे. त्यांना उत्तर देताना नाकीनऊ येत आहे." - रुपेश वलके, रेशन दुकानदार