गडचिराेली : शहरातील विवेकानंद नगरमधील पाण्याच्या टाकीतून शहरात पाणी पुरवठा हाेणाऱ्या पाईपमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. याेगेश शेषराव देवाेजवार (रा. विवेकानंद नगर) असे मृताचे नाव असल्याचे रात्री उशीरा पोलिसांनी स्पष्ट केले.
याेगेश हा गतिमंद हाेता. त्याच्यावर नागपूर येथील मनाेरुग्ण रुग्णालयात उपचार सुरू हाेते. बुधवारपासून ताे बेपत्ता हाेता. त्याच्या कुटुंबियांनी गुरुवारी तो बेपत्ता असल्याची तक्रार गडचिराेली पाेलीस ठाण्यामध्ये दिली. कन्नमवार वाॅर्ड, पाेलीस ठाणे परिसर, माता मंदिर परिसरातील नळांना गुरूवारी सायंकाळपासून पाणी येणे बंद झाले हाेते. याबाबतची तक्रार वाॅर्डमधील नागरिकांनी नगर परिषदेकडे केली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी चामाेर्शी मार्गावरील व्हाॅल्व्ह खाेलला असता, त्या व्हाॅल्व्हमध्ये याेगेशचा मृतदेह आढळला. पाईपमध्ये मृतदेह आढळताच खळबळ उडाली.
याेगेशने बुधवारीच पाण्याच्या टाकीत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंदिरानगर येथील पाण्याची टाकी अतिशय माेठी आहे. पाईप जवळपास दीड फुट व्यासाचे आहेत. त्यामुळे याेगेशचा मृतदेह पाईपमध्ये शिरला. याेगेशला तीन बहिणी व आई-वडील आहेत. गडचिराेली शहरातील चामाेर्शी मार्गावरील अनेक दुकानदार तसेच गडचिराेली पाेलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांना ताे सुपरिचित हाेता. त्याने डी. एड्.चे प्रशिक्षण घेतले हाेते.
नागरिकांनी फेकले घरातील पाणी
पाणी टाकीच्या पाईपमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच अनेकांनी घरातील नळाचे पाणी फेकून दिले. विवेकानंद नगरातील पाण्याची टाकी ही शहरातील सर्वात माेठी पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीतून लांझेडा, स्नेह नगर, गाेकुल नगर परिसर, राम नगर, कॅम्प एरिया, विवेकानंद नगर आदी प्रभागांना पाणी पुरवठा हाेते. नगर परिषदेमार्फत ही पाण्याची टाकी स्वच्छ केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.