गडचिरोली: सुमारे ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी सुपारी देऊन वृध्द सासऱ्याची थंड डोक्याने हत्या केल्याच्या आरोपाखाली येथीलनगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिला ६ जून रोजी नागपूरात अटक झाली. या हायप्रोफाईल'लेडी किलर'ची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त असल्याची माहिती आता उजेडात आली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापायी सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने सासऱ्याला संपविल्याच्या घटनेने प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. शहराची रचना ठरविणाऱ्या अर्चना पुट्टेवारने गुन्हेगारी पाऊल उचलून स्वत:च्या आयुष्याचीच 'रचना' चुकविली, अशी चर्चा आहे.
पुट्टेवार परिवारात तब्बल ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद सुुरु होता. २२ मे रोजी नागपुरात मानेवाडा चौकालगत कारच्या धडकेने पुरुषोत्तम पुट्टेवार (८२,रा.शुभनगर , मानेवाडा) यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती नोंद करुनच तपास केला, पण चौकशीत हा घातपात असल्याचे उजेडात आले. त्यानंतर याचे धागेदोरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून व गडचिरोली येथील नगररचना विभागात सहायक संचालक पदावर असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यापर्यंत असल्याचे समोर आले. तिने चालक सार्थक बागडे यास सुपारी देऊन सचिन धार्मिक व नीरज उर्फ नाईंटी निमजे या दोहोंच्या मदतीने थंड डोक्याने कट रचून सासऱ्यास संपविल्याचे उघडकीस आले. अर्चनाचा पती मनीष डॉक्टर असून सासू शकुंतला यांचे ऑपरेशन झाल्याने दवाखान्यात होत्या. पत्नीला भेटून घरी जाताना पुरुषोत्तम यांना कारने धडक देऊन अपघात भासविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, अर्चना पुट्टेवार ही सध्या पोलिस कोठडीत आहे.
जमीन एनएसाठी करण्यासाठी रेटकार्डजमिनीचा वापर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी म्हणजेच नॉन ॲग्रीकल्चरकरता (एनए)करायचा असेल तर नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवान्यासाठी सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिचे दर ठरलेले होते, अशी माहिती प्लॉटिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली. फाईलवर 'वजन' ठेवल्याशिवाय ती पुढे सरकतच नव्हती. दररोज नगररचना कार्यालयात याद्वारे मोठी 'उलाढाल' होत असे. हेकेखोर स्वभावाच्या अर्चना पुट्टेवारचे कार्यालयीन सहकाऱ्यांशीही फारसे पटत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.
वरिष्ठ कार्यालयात तक्रारी, पण कारवाई नाहीचअर्चना पुट्टेवार हिची कार्यपध्दती वादग्रस्त होती, त्यामुळे तिच्याबद्दल अनेक तक्रारी नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, या तक्रारींची ना चौकशी झाली ना कारवाई. तक्रारी दडपण्यासाठी ती वजन वापरत असे, त्यामुळे या तक्रारींवर कुठलीही कारवाई होत नसे. वरिष्ठ कार्यालयात तिला पाठीशी घालणारे कोण, याची चर्चा आहे.
पूररेषेतही एनए परवाने कसे ?दरम्यान,गडचिरोली शहराजवळील नवेगाव, मुडझा, कोटगल या भागालगत वैनगंगा नदी आहे. हा परिसर पूररेषेत येतो. मात्र, येथे भूमाफियांना हाताशी धरुन एनए परवाने वाटण्याचा प्रताप अर्चना पुट्टेवार हिच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. भूमाफियांना तिने संरक्षण दिल्यानेच पूररेेषेतील प्लॉटिंगलाही सोन्याचा भाव आला, या धोकादायक परिसरात मोठे इमले उभे राहिले. तिच्या कार्यकाळात दिलेल्या एनए परवान्यांची चौकशी झाल्यास मोठे गैरव्यवहार उजेडात येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.