गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणाच्या महाविस्तीर्ण दंडकारण्य जंगलात ते लहानाचे मोठे झाले. गरीब, आदिवासी कुटुंबातील मुला-मुलींचे वय शिक्षण घेण्याचे, पण पेन, पुस्तकाची जागा शस्त्रांनी घेतली होती. काही कुटुंबांनी नक्षल चळवळीचा मार्ग सोडला अन् पोलिसांना शरण येणे पसंत केले. पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेद्वारे आता ते शहरात स्थिरावले आहेत. ज्या हातांनी एकेकाळी शस्त्र चालविले तेच हात आता स्वयंरोजगाराकडे वळले असून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागले आहे.
कहाणी आहे मनीषा व महागू वड्डे या जोडप्याची. मुरखळा (नवेगाव) येथील नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पण करणारी ७० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. यापैकीच एक वड्डे दाम्पत्य. या वस्तीतील सर्वात टोलेजंग घर याच जोडप्याचे.
मनीषा यांचे शिक्षण जेमतेम पाचवी तर महागू हे आठवी शिकलेले. मनीषा जुगनूराम कुडचामी या रानगट्टा (ता. कोर्ची ) तर महागू चमरु वड्डे हे कुदरी (ता. एटापल्ली) गावचे रहिवासी. वयाच्या १४ - १५ व्या वर्षी दोघेही नक्षली चळवळीकडे वळले.
चपळ शरीर, नक्षली चळवळीसाठी जीव धोक्यात घालून रोजची जगण्या-मरण्याची लढाई. महाकाय जंगलखोऱ्यात वास्तव्य, पोलिसांशी चकमक, एके ४७ सारखे शस्त्र चालविण्याचे कसब असा त्यांचा दिनक्रम होता. २००९ मध्ये चळवळीत आलेल्या महागू वड्डे यांना कर्तव्यनिष्ठा पाहून २०१६ मध्ये कमांडर म्हणून बढती दिली गेली. याच काळात त्यांना डेप्युटी कमांडरचे सुरक्षारक्षक म्हणून नेमले गेले. २०११ मध्ये महागू व मनीषा यांची तिपागड जंगलात पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१५ मध्ये कसनसूर येेथे त्यांचा विवाह पार पडला. पुढे त्यांचे मनपरिवर्तन झाले व २०१९ मध्ये त्या दोघांनी एटापल्लीच्या हालेवारा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांकडून मनीषा यांना सव्वा पाच लाख रुपये व महागू यांना सात लाख रुपये बक्षीस मिळाले.
बचत गटातून उन्नतीचा मार्ग
महागू यांना पोलिसांनी रोजगार मिळवून दिला आहे तर मनीषा या बचत गट चालवितात. शिवशक्ती शाम सहायता समूह या बचत गटाच्या त्या अध्यक्षा असून एकूण १० महिलांचा यात सहभाग आहे. जानेवारी २०२३ मध्ये या बचत गटाची सुरुवात झाली. मनीषा यांच्याप्रमाणे इतर महिलांनीही बचत गटातून प्रगतीचा मार्ग जोखला आहे.
आत्मसमर्पणानंतर पुन्हा एकदा बोहल्यावर
२०२० मध्ये पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या १०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा लावला होता. यात पुन्हा एकदा मनीषा व महागू हे बाेहल्यावर चढले. विवाहानंतर वर्षभरातच त्यांना आदीम आवास योजनेतून घरकुल मिळाले. स्वत:जवळील काही पैसे टाकून त्यांनी सिमेंट क्राँक्रीटचे घर बांधले, दारात दुचाकीही आली आहे.
उत्पादन ते विक्रीची साखळी
नवजीवन वसाहतीत तीन बचत गट आहेत. यापैकी एक बचत गट फिनाइल (स्वच्छतेसाठीचे द्रव) बनवतो. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पोलिसांनी नवजीवन उत्पादक संघ स्थापन केला आहे. याद्वारे हे फिनाइल शासकीय कार्यालयांसह खासगी व्यापाऱ्यांना विक्री केले जाते. यामुळे उत्पादन ते विक्री अशी साखळी तयार झाली आहे.