गडचिराेली : तेलंगणा व महाराष्ट्रात आपली विशेष ओळख निर्माण केलेला कलेक्टर आता गडचिराेलीतही पाेहाेचला आहे. सिराेंचात तर जिल्हाधिकारी नाही, मग ते गडचिराेलीत कसे येणार असा प्रश्न पडला असेल. मात्र, कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी नसून ती एक आंब्याची प्रजात आहे. या प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांची लागवड गडचिराेली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या नागपूर मार्गावरील राजेश इटनकर यांनी त्यांच्या आय फार्ममध्ये केली आहे. आकाराने अतिशय माेठे असलेले हे आंबे लक्ष वेधून घेत आहेत.
आंब्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील कलेक्टर हा आंबा आकाराने अतिशय माेठा आहे. हा आंबा अडीच किलाे वजनापर्यंत वाढताे. या आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने सिराेंचा तालुक्यात घेतले जाते. मात्र, प्रयाेगशील शेतकरी असलेल्या राजेश इटनकर यांनी या प्रजातीच्या आंब्यांची लागवड स्वत:च्या फार्ममध्ये केली. सध्या आंबे एक किलाे वजनाचे झाले आहेत. पुढे हे आंबे अडीच किलाे वजनापर्यंत वाढणार आहेत. या आंब्यांची चव आता गडचिराेलीवासीयांनाही चाखता येणार आहे.
इटनकर यांनी फार्ममध्ये दशेरी, केशर, निलम, मल्लिका, आम्रपाली, ताेतापुरी, लंगडा या प्रजातींच्या आंब्यांची लागवड केली आहे. त्याचबराेबर जांभूळ, ॲप्पल बाेर, काजू, फणस व इतरही फळझाडांची लागवड केली आहे.
जिल्ह्यातील वातावरण फळ पिकांसाठी याेग्य नाही, असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, इटनकर यांच्या फळबागेतील फळझाडांकडे लक्ष घातले तर हा समज चुकीचा असल्याचे दिसून येते. फळपिकांची याेग्य काळजी घेतल्यास फळशेतीतून चांगले उत्पादन मिळविता येणे शक्य आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळबागेसाठी याेग्य आहे. मात्र, शेतकरी फळशेतीकडे वळेल यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ धान शेतीवर अवलंबून न राहता, फळशेतीकडे वळावे. माझ्या फळबागेला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतही प्रयाेग करावे.
- राजेश इटनकर, फळबाग शेतकरी.