दिगांबर जवादेगडचिराेली : नाल्याच्या पाण्यात वाहून जात असलेल्या शेळीच्या पिलाला वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी वाहून गेल्याची घटना आरमाेरी तालुक्यातील कुलकुली येथे बुधवारी सायंकाळी घडली. विठ्ठल हणमंत गेडाम (५४) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल कुलकुली येथील विठ्ठल गेडाम यांच्याकडे तीस ते पस्तीस शेळ्या आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याच्या पलीकडे शेतालगतच्या जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. बुधवारी कुलकुली परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नाल्याला अचानक पूर आला. पाणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने शेळ्यांना सोबत घेऊन घराकडची वाट धरली.
नाल्याजवळ आल्यानंतर शेळीचे पिल्लू अचानक नाल्यात उतरले. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना विठ्ठल हा सुद्धा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. गुरुवारी पुन्हा सकाळी शोधमोहीम राबविली असता सकाळी ७ वाजताच्या सुमारास नाल्यातील रेतीत अर्धवट झाकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे. मृतक विठ्ठल गेडाम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा आहे.