गडचिराेली : घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरू, दोन दिवसांवर लग्न आले असल्याने उत्साहाचे वातावरण, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नेहमीप्रमाणे नियोजित वराचे पिता गुरांना चारायला जंगलात घेऊन गेले आणि घात झाला. एका बेसावध क्षणी वाघाने त्यांच्यावर झडप घातली अन् एका झटक्यात त्यांचे प्राण हिरावून घेतले. मुलाच्या लग्नाची तयारी सोडून पित्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची दुर्दैवी वेळ सयाम कुटुंबीयांवर आली.
मन हेलावून सोडणारी ही घटना आरमोरी तालुक्यातील कुरंझा येथे गुरुवारच्या सायंकाळी घडली. जालमशहा गोविंदशहा सयाम (६५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी ते गावालगतच्या जंगलात गेले होते. साेबत त्यांचा मुलगा भारतसुद्धा शेळ्या चारण्यासाठी गेला हाेता. दिवसभर गुरे व शेळ्या चारल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास त्यांनी गावाची वाट धरली; पण कळपात एक बैल दिसत नसल्याचे जालमशहा यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलाला गायी-बैल व शेळ्यांचा कळप गावाकडे घेऊन जाण्यास सांगून स्वत: बैलाच्या शाेधात जंगलाच्या दिशेने निघाले. सायंकाळपर्यंत घरी परतले नाही.
अखेर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही लाेक त्यांना शोधण्यासाठी जंगलात गेले. ज्या ठिकाणाहून जालमशहा जंगलात आत गेले हाेते, त्याच परिसरात त्यांचे जाेडे, काठी, दुपट्टा तसेच रक्त सांडलेले दिसून आले. त्यामुळे वाघाने जालमशहा यांना ठार केले असावे, अशी शंका त्यांना आली. जंगलात पुढे जाण्याची कोणाची हिंमत नसल्याने सर्व जण गावाकडे परतले. त्यानंतर कुरंझासह देवीपूरमधील काही लाेकांच्या मदतीने सर्व जण एका ट्रॅक्टरने जंगलात गेले. रात्री ८ च्या सुमारास जालमशहा मृतावस्थेत आढळले. वाघाने त्यांचा एक हात व पायाचा काही भाग फस्त केला हाेता. रात्री १०.३० वाजेपर्यंत वन व पाेलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह घरी आणला. शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भरकटलेला बैल आला; पण मालक गेला
ज्या बैलाच्या शाेधात जालमशहा सयाम पुन्हा जंगलात गेले, तो बैल तर बरोबर घरी आला; पण जंगलात जालमशहा एकटे असल्याचे हेरून वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि जागीच ठार केले. विशेष म्हणजे रविवारी जालमशहा यांच्या मुलाचा लग्न सोहळा होता. त्यासाठी शुक्रवारी मंडपपूजन होते; पण ती तयारी सोडूून अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली.