लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील दाेन वर्षांतील दिवाळीवर काेराेनाचा प्रभाव हाेता. त्यामुळे हा सण साजरा करताना गर्दी झाल्यास नागरिकांच्या मनात अनामिक भीती निर्माण हाेत हाेती. यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करतात. तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन राहते. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते.
दिवाळी बघून पाऊस झाला गायब - आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याला परतीच्या पावसाने झाेडपून काढले हाेते. हा पाऊस दिवाळीपर्यंत मुक्काम ठाेकणार काय, अशी शंका उपस्थित केली जात हाेती. मात्र, पाऊस परत गेेला आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक आहे. नागरिकांना दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा - चाैदा वर्षांचा वनवास संपल्यानंतर प्रभू रामचंद्र हे अयाेध्येत परतले ताे दिवस दिवाळीचा. या दिवशी अयाेध्येतील नागरिकांनी घरांसमाेर दीप लावून आनंदाेत्सव साजरा केला हाेता. त्यावेळी निश्चितच फटाके नव्हते. आता मात्र दिवाळीसाठी माेठ्या प्रमाणात फटाके फाेडले जातात. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण हाेते. फटाक्यांमुळे काही जणांचा जीव जातो. ही बाब लक्षात घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे पुढाकार घेण्याची गरज आहे.
बाजारपेठेत चार दिवसांपासून गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने सण अग्रिम रक्कम दिली आहे. खासगी कंपन्यांनी बाेनस दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. प्रत्येकाच्या खिशात पैसा आला असल्याने विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मागील चार दिवसांपासून नागरिकांची गर्दी उसळली आहे.
कापूस व साेयाबीन काढणीस सुरुवात - दिवाळी हा सण साेबत लक्ष्मी घेऊन येते असे मानले जाते. मागील आठ दिवसांपासून कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. साेयाबीन व कमी कालावधीच्या धानाची काढणी पूर्ण झाली आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येण्यास सुरुवात झाली आहे.
साेयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर परतले
- दसऱ्यानंतर जिल्हाभरातील हजाराे मजूर यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये साेयाबीन कापणीसाठी गेले हाेते.
- हे मजूर आता दिवाळीनिमित्त गावाकडे परत आले आहेत. मजुरीच्या पैशातून दिवाळीचा सण साजरा करणार आहेत.