लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात व्याघ्र व इतर वन्यजीवांच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी गडचिरोली वनविभागात गुरवळा / हिरापूर संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नेचर सफारी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या नेचर सफारीमुळे पर्यटकांना वाघ, बिबट, अस्वल यासारखे विविध प्रकारचे वन्यजीव जंगलात पाहण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली. नेचर सफारीमध्ये भेट देण्याऱ्या बहुतांश पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. १० नोव्हेंबरपासून नेचर सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली.
संयुक्त वनव्यवस्थापन समिती गुरवळा यांच्या वतीने १० डिसेंबर २०२१ रोजी नेचर सफारीची सुरुवात करण्यात आली. ३७३२.५३ हेक्टर जंगल क्षेत्रावर ही सफारी आहे. पर्यटकांना वाहनाद्वारे जंगलात निसर्गाचा अनुभव घेता यावा, यासाठी जुन्या पायवाटा दुरुस्त करून एकूण ६० कि.मी.चे कच्चे रस्ते तयार केले. येथे वनपर्यटनासह प्राणीदर्शन होते.
दिवसातून दोन वेळा करता येते सफारी नेचर सफारीत सकाळी व सायंकाळी निसर्गाचा अनुभव घेता येतो. सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत (उन्हाळ्यात) सफारीचा अनुभव पर्यटकांना घडवून आणतात. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर हा पावसाळ्याचा कालावधी वगळता उन्हाळा व हिवाळ्यात सफारीतील पर्यटन सुरूच असते. पर्यटनासाठी गाइड किंवा समितीकडे नोंदणी करावी लागते. प्राणी बघण्यासह निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी वनसमितीतर्फे गाइडची नियुक्ती केली आहे.
सफारीसाठी प्रवेश शुल्क किती? नेचर सफारीत खासगी वाहनासाठी १ हजार १०० रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागते. तर वन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या जिप्सीकरिता ३ हजार १०० रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागतात. दोन्ही वाहनांमध्ये गाइडसुद्धा उपलब्ध करून दिला जातो.
जंगलात वाघांसह विविध प्राण्यांचा वावर
- गुरवळा नेचर सफारीत सध्या जी-१, जी-१६ हे नरवाघ वावरत असून, जी-१० ही वाघीण व तिचे ४ बछडे आहेत. सध्या हे बछडे मोठे झालेले आहेत. त्यांचा वावर या भागात असून, पर्यटकांना वेळोवेळी त्यांचे दर्शन होते.
- नेचर सफारीत बिबट, अस्वल, तडस, रानकुत्री, कोल्हे, रानमांजर, हरीण, सांबर, नीलगाय यासह पक्ष्यांमध्ये मोर, रानकोंबड्या आदींसह विविध प्रकारचे वन्यजीव पाहायला मिळतात. त्यामुळे तीन वर्षांपासून पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.
"गुरवळा येथील नेचर सफारीत विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. हे वन्यजीव प्रत्यक्ष पाहता येतील. यासाठी वाहने व गाइड उपलब्ध आहेत. नेचर सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना जिल्ह्यातच निसर्गाचा अनुभव घडवून आणण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे." - विजय जनबंधू, क्षेत्रसहायक, गुरवळा