गडचिरोली : वडील सकाळीच मद्यपान करून आल्याने मुलाचा राग अनावर झाला. कुटुंबात कडाक्याचा वाद झाला. यावेळी समजावण्यासाठी गेलेल्या आजीला नातवाने काठीने मारहाण केली, यात आजीचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना ३ नोव्हेंबरला नवतळा येथे घडली. आराेपीला पाेलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ताराबाई पांडुरंग गव्हारे (वय ७५) असे मारहाणीत ठार झालेल्या वयाेवृद्ध महिलेचे नाव आहे, तर भाऊराव मनोहर कोठारे (वय २९) रा. नवतळा असे आराेपीचे नाव आहे. ताराबाई गव्हारे या भाऊराव काेठारे याची मायआजी होत्या. नवतळा येथे मुलगी व जावई मनोहर कोठारे यांच्यासाेबत त्या राहत. शुक्रवारी सकाळी मनोहर कोठारे हा दारू पिऊन घरी आला. ही बाब भाऊरावला खटकली. त्याने वडिलांसह आईलासुद्धा शिवीगाळ केली.
कुटुंबात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी ताराबाईने नातवाला समज देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाऊरावचा राग अनावर झाला. त्याने ‘तू आमच्या घरात राहून फुकटचे खातेस’ असे म्हणत आजीला काठीने हात, पाय व शरीरावर जोरदार मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णलयात पाठविला. आपल्या मोटारसायकलने पळ काढला. खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास उपनिरीक्षक प्रभाकर भेंडारे करीत आहेत.
खून करून मंदिरात बसला लपून
या घटनेनंतर भीतीपाेटी भाऊराव गव्हारेने दुचाकीवरुन धूम ठोकली. चामोर्शी गाठून एका मंदिरात तो दडून बसला होता. पो.नि. विजयानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास गतिमान केला. त्यानंतर त्यास मंदिरातून ताब्यात घेतले. त्यास ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
खुनांचे सत्र सुरू
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत खुनांचे सत्र सुरू आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अहेरी तालुक्यातील महागावात पाच जणांची हत्या केल्याची थरारक घटना घडली होती. त्यानंतर आलापल्लीत प्रेमप्रकरणातून तरुणास संपविले. यात नवतळा घटनेची भर पडली.