धानोरा (गडचिराेली) : मृत्यू अनपेक्षितपणे केव्हा देहाच्या द्वारावर धडक देईल, हे सांगता येत नाही. काळ, वेळ व प्रसंगावरही मात करताे. शेतावर पीक पाहणीसाठी जाणाऱ्या वृद्धाला मनातही वाटले नसावे की, आपली ही पैदलवारी शेवटची ठरेल. गावातून मुख्य रस्त्यावर येताना भरधाव कार आली. याचवेळी आकस्मिक गुरांचा कळप आडवा आला अन् चालकाने कार रस्त्याच्या खाली उतरवित वृद्धाला जाेरदार धडक दिली. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना धानाेरा तालुक्यातील येरकड येथे रविवार २ ऑक्टाेबर राेजी सकाळी ९ वाजता घडली.
तुळशीराम सीताराम मडावी (८०) राहणार येरकड असे मृतकाचे नाव आहे. एमएच ३३ एसी २३९७ ह्या क्रमांकाची कार गडचिरोलीवरून मुरूमगावकडे जात होती. याच वेळी धानाेरा-मुरूमगाव मार्गावर असलेल्या येरकड येथील तुळशीराम मडावी हे आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान येरकड येथील ग्रामपंचायतसमोर गुरांचा कळप आला. त्यामुळे कारचालकाने वाहन रस्त्याच्या खाली उतरविले. वाहन भरधाव वेगात असल्याने मडावी यांच्या अंगावरून गेले.
दरम्यान नागरिकांनी त्यांना गंभीर अवस्थेत धानोरा ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. गुरांचा कळप आडवा आला नसता तर वाहन रस्त्याच्या खाली उतरले नसते व मडावी यांचा बळी गेला नसता, अशी भावना लाेकांनी व्यक्त केली.