प्रदीप बोडणे
वैरागड (गडचिरोली) : सोळाव्या शतकातील बाजारपेठेचे गाव असणाऱ्या वैरागड येथे पूर्वी हिऱ्याची खाण होती. या खाणीच्या संरक्षणार्थ तत्कालीन राजाने किल्ला बांधला होता. या किल्ल्यात आणि गावाच्या सीमावर्ती भागात मजबूत धाटणीच्या गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा विविध आकाराच्या १०० विहिरी आहेत. काळाच्या ओघात त्यातील बहुतांश विहिरी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ‘१०० विहिरींचे गाव’ अशी या गावाची ओळख आता नष्ट होऊ पाहात आहे.
आरमोरी या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ कि.मी. अंतरावर पूर्वेला वैरागड हे गाव आहे. येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती देवीची मूर्ती आणि इतर हेमाडपंथी मंदिरे आहेत. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.
हिऱ्याच्या खाणीला संस्कृतमध्ये वज्रगर असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन वैरागड असे नाव प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन संयुक्त मध्यप्रदेश राज्यात या भागाचा समावेश होता. त्यावेळी चंद्रपूर, वैरागड, राजनांदगाव या मोठ्या बाजारपेठा होत्या. वैरागडमधील भौगोलिक खुणा लक्षात घेता येथे मोठे गाव असावे असे लक्षात येते. गावाच्या सीमावर्ती भागात १०० ते २०० फुटांवर विहिरी आढळून येतात.
पर्यटकांसाठी आकर्षण
वैरागड किल्ल्याच्या १२ एकरात सभोवती बुरूज, तट आहेत. मधल्या परिसरात आज ८ विहिरी आहेत. त्या विहिरी त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, अष्टकोनी व गोलाकार आहे. त्यात एक पायऱ्यांची विहीरसुद्धा आहे. या पायऱ्यांच्या विहिरीची बरीच पडझड झाली आहे. पण या विहिरींची जपणूक करण्याकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष नाही. बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने गेल्यावर्षी एका विहिरीची पुरातत्त्व विभागाने दुरुस्ती केली. या विहिरी किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
वारसा जपण्याची गरज
गावातील विहिरींची संख्या मोठी असून एका चौकात उभे राहिल्यास थोड्याच अंतरावर ४ ते ५ विहिरी दृष्टीत पडतात. विहिरींची बांधणी योग्य असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. त्यांचे पाणीही गोड आहे. पण बोअरवेलसह पाण्याचे इतर स्रोत निर्माण झाल्याने या विहिरींच्या पाण्याचा वापर क्वचितच होतो. वापर नसल्याने त्यात कचराही जमला आहे. काही विहिरी तर कचऱ्याने बुजूनही गेल्या आहेत. कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेल्या या विहिरींचा ठेवा जपल्यास गावाची ओळख कायम राहण्यासोबत पर्यटकांनाही त्यांचे आकर्षण राहील.