गडचिराेली : येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाने स्वत:वर बंदुकीच्या गाेळ्या झाडल्याची खळबळजनक घटना ११ डिसेंबर राेजी बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. उमाजी हाेळी (४३) रा. गडचिराेली असे स्वत:वर गाेळ्या झाडलेल्या पाेलिस अंमलदाराचे नाव आहे.हाेळी हे जिल्हा पाेलिस दलात अंमलदार असून प्रमुख न्यायाधीशांचे सुरक्षा रक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे उमाजी हाेळी हे न्यायालयात कर्तव्यावर आले. न्यायाधीशांना वाहनातून उतरविल्या काही वेळात त्यांच्या हातातील बंदुकीने त्यांनीच गाेळ्या झाडल्या. यावेळी त्यांनी सहा गाेळ्या झाडल्या. यापैकी तीन गाेळ्या हाेळी यांच्या छातीवर लागल्या तर तीन गाेळ्या परिसरात वरती झाडल्या गेल्या. लगेच पाेलिस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अंमलदार हाेळी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेने न्यायालय परिसरात खळबळ माजली आहे. हाेळी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.
उमाजी हाेळी यांच्या हातून अनावधानाने त्यांच्याच बंदुकीचा स्टिगर दबल्या गेला व ताे दबून राहिला. त्यामुळे सहा गाेळ्या झाडल्या गेल्या. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. अनावधानाने ही घटना घडली, असे गडचिराेलीचे पाेलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.