गडचिरोली : जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळात नियम डावलून कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी करत शासनाची तिजोरी रिकामी केल्याचा आरोपामुळे चर्चेत आलेल्या व आरोग्य विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशी प्रलंबित असलेल्या वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुढे हे पुन्हा 'कारभारी' झाले आहेत. १३ ऑगस्टला जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण केली, त्यामुळे नियत वयोमानानुसार त्यांचा सेवाकालावधी संपुष्टात आला होता. मात्र, त्यांनी सेवानिवृत्तीच्या मुदतवाढीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर येथे दाद मागितली होती. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मुंबई यांनी २९ जुलै २०२४ रोजी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे नागपूरच्या उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. कांचन वानेरे यांनी १३ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यान्हपूर्व डॉ. प्रमोद खंडाते यांना सेवामुक्त करण्याचे आदेश दिले, सोबतच रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुढे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त प्रशासकीय व वित्तीय कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्याचे नमूद केले. यानंतर डॉ. रुढे लगबगीने जिल्हा शल्यचिकित्सकपदाच्या खुर्चीत बसले. त्यामुळे डॉ. रुढे यांच्या डोक्यावर नेमका कोणाचा हात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यांच्याच आदेशाने पदभारडॉ. अनिल रुढे यांच्याबाबत गैरव्यवहाराची तक्रार होती. याबाबत उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. कांचन वानेरे यांनी १५ मे २०२४ रोजी सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. पी. एम. गवई यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी प्रलंबित आहे. यासोबतच गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडेही डॉ. रुढेंबाबत तक्रार असून त्याचीही चौकशी सुरु आहे. ज्या उपसंचालकांनी डॉ. रुढेंच्या चौकशीचे आदेश दिले, त्यांनीच डॉ. रुढेंकडे जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विरोधी पक्षनेत्यांनी घेतला होता आक्षेप, तरीही...दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली होती. खरेदी घोटाळ्याची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. अनिल रुढेंकडेच जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबत आता विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
"वरिष्ठांच्या आदेशावरुन हा अतिरिक्त पदभार दिला आहे. ही पूर्णवेळ नियुक्ती नाही. प्रशासकीय कामकाज सोयीचे व्हावे, यासाठी हा तात्पुरता पदभार दिलेला आहे. त्यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्या कळवाव्यात, याबाबत वरिष्ठांना अवगत करण्यात येईल."
- डॉ. कांचन वानेरे, उपसंचालक (आरोग्य सेवा)