धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील हेटी या गावात मंगळवारी सकाळी धानोरा पोलिसांनी छापा टाकून एका घरातून जप्त केलेली रक्कम बँकेत नेऊन मोजण्यात आली. ते ३२ लाख ६२ हजार २१० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. परंतु त्या इसमाकडे एवढी रक्कम आली कुठून, याचे रहस्य उलगडण्यात दुसऱ्याशी दिवशी पोलिसांना यश आले नाही.
हेटी येथील साईनाथ मंगरू कुमरे (५० वर्ष) यांच्या घरी ही रोख रक्कम एका पोत्यात भरून ठेवलेली पोलिसांना आढळली. नक्षलवाद्यांचा पैसा त्यांच्याकडे ठेवला असल्याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या संशयानुसार घरात पैसेही आढळले. मात्र, कुमरे यांनी त्या पैशाचा नक्षलवाद्यांशी कोणताही संबंध नसून तो ‘सट्टापट्टी’च्या व्यवसायातून कमाविलेला असल्याचेे सांगितले. त्यामुळे कुमरे यांच्यावर बुधवारी संध्याकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शिवाय मंगळवारीच त्यांना पोलिसांनी सोडूनही दिले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्यासह उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, हवालदार नैताम, नायक चोरकुटे, नायक उसेंडी, शिपाई दुग्गा, कृपाकर, आडे, खोब्रागडे, गोडबोले तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्र.१० च्या १७ कर्मचाऱ्यांनी केली.
गुन्हा तर घडलाच, तरीही सोडले कसे?
वास्तविक कोणत्याही ठोस कारणाशिवाय घरात एवढी रक्कम रोख स्वरूपात ठेवता येत नाही. या प्रकरणात तर ज्यांच्या घरी ती रक्कम सापडली त्यांनी ती सट्टापट्टीतील असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सट्टीपट्टीचा व्यवहार असो किंवा नक्षल समर्थक कृती असो, दोन्ही गुन्हा ठरत असताना पोलिसांनी कोणताच गुन्हा दाखल न केल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका नागरिक व्यक्त करीत आहेत.
पोत्यात १० रुपयांपासून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल
दि. २३ च्या सकाळी धानोरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना हेटी येथील साईनाथ मंगरू कुमरे यांच्या घरी बेहिशेबी मालमत्ता ठेवलेली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ती रक्कम नक्षल्यांची असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. सानप यांनी तत्काळ ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव व पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांना दिली. त्यानंतर दोन पंचांसह पोलीस पथकाने हेटी येथील कुमरे यांच्या घराची झडती घेतली असता घरात भारतीय चलनाच्या ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नोटांचे बंडल मिळून आले. एकूण ३२ लाख ६२ हजार २१० रुपये आढळले.
आयकर विभाग करणार पैशाची चौकशी
कुमरे यांच्याकडील हा पैसा बेहिशेबी आहे की त्याचा कुठे हिशेब लागतो का, हे तपासण्यासाठी अपर आयकर निदेशक नागपूर यांना कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालानुसार पुढील कारवाई होईल, असे पोलीस निरीक्षक देडे यांनी सांगितले.