लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात झालेल्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. सदर माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पशुगणनेचे काम १०० टक्के पूर्ण झालेले आहे परंतु २० व्या पशुगणनेच्या तुलनेत जिल्ह्यातील गाय, म्हशीसोबत मेंढ्यांचीही संख्या बरीच घटलेली आहे.
शेती व्यवसाय करण्यासाठी अनेकजण जनावरे पाळतात. काहीजण दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, तर मांस मिळवण्यासाठी शेळ्या-मेंढ्या मेंढ्यांपासून लोकरही मिळविली जाते. गत वर्षात शेतात यांत्रिकीकरणाचे प्रमाण भरपूर वाढले. याचा परिणाम गायी, बैल पाळणे बंद झाले. चारा तसेच गुराख्यांचीही समस्या निर्माण झाली. त्यामुळे अनेकजण पाळीव जनावरे विकू लागली. जिल्ह्यातील गायी, बैल, शेळ्या-मेंढ्या व म्हशींच्या संख्येत बरीच घट झालेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात जनावरांच्या तस्करीचेही प्रमाण वाढलेले आहे. १६४५ गावांत पशु गणनेचे काम करण्यात आले. याशिवाय २१० वॉर्डात हे काम झाले. जिल्ह्यात एकूण १ हजार ८५५ गावांमध्ये पशुगणना करण्यात आली.
२० व्या पशुगणनेतील स्थितीजिल्ह्यात २०१९ मध्ये २० वी पशुगणना झाली तेव्हा गाय वर्ग ४५ हजार ४७१, म्हैस वर्ग ६६ हजार २५९, मेंढ्या १८ हजार ६०५, शेळ्या २ लाख ३९ हजार ५८७, वराह २५ हजार २१० असे एकूण ८ लाख ९ हजार १३२ इतके पशुधन होते. कोंबड्या, बदके व इतर १० लाख १८ हजार ९६९ एवढी पाळीव पक्षी संख्या होती. यात मात्र वाढ झाली आहे.
काय आहे योजनेचा उद्देश?पशुगणननेमुळे जिल्ह्यातील पशुधनाची संख्या निर्धारीत होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल तसेच योजनांमध्ये सूसुत्रता आणण्यासाठी पशुगणना केली जात आहे. सदर मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
"जिल्ह्यातील पशुगणना पूर्ण झालेली आहे. मुदत संपण्यापूर्वीच १० एप्रिलला पशुगणनेचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. शासनाला ही आकडेवारी पाठविण्यात आलेली आहे."- अजय ठवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी