गाेपाल लाजूरकरगडचिराेली : समाेर अचानक रानटी हत्तींच्या रुपाने ‘काळ’ उभा हाेता. हत्ती जाेरजाेरात किंकाळी फाेडत हाेते. वय सुद्धा वाढलेले असल्याने जीव वाचवण्यासाठी पळसुद्धा काढता येत नव्हता, अशावेळी कशीतरी धाव घेतली; परंतु ही धावसुद्धा काडी रुतून पायाला जखम हाेण्यास कारणीभूत ठरली. तरीसुद्धा धावतपळत झाडाचा आश्रय घेऊन त्यावर ताे कसातरी चढला. याचवेळी आरडाओरड केली; पण काही क्षणातच दातखिळी बसली अन् त्या शेतकऱ्याला अख्खी रात्र झाडावरच रानटी हत्तीच्या दहशतीत काढावी लागली. थरकाप उडवणारी व राेमांचकारी ही घटना धानाेरा तालुक्यात १० मे राेजी घडली.
धानाेरा तालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या चवेला येथील रामजी दर्राे (६०) असे त्या शेतमजुराचे नाव आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर ट्राॅलीद्वारे शेणखत टाकण्याकरिता सायंकाळी जात असताना ओबडधाेबड रस्त्यामुळे जात असताना ट्रॅक्टर वाटेत उलटले. ट्राॅली सरळ करून काही शेणखत शेतात नेली व तेथे एका बांधीत शेणखत संपूर्ण आठ मजुरांनी उपसले. यासाठी त्यांना सायंकाळ हाेऊन अंधार पडला. त्यामुळे ड्रायव्हरने ट्रॅक्टरचे लाईट सुरू केले; परंतु याचवेळी एक रानटी हत्ती ट्रॅक्टरजवळ आला व जाेरजोरात ओरडू लागला. हत्तीला पाहून मजुरांमध्ये भीती निर्माण झाली व ते गावाच्या दिशेने सैरावैरा पळू लागले.
परंतु रामजी हा वयाेवृद्ध असल्याने जाेरात पळू शकला नाही. याचवेळी त्याच्या पायाला काडी (खूंट) रुतली. त्याच्या पायाला जखम झाल्याने त्याला जाेरात पळता येत नव्हते. त्याचे सोबती जीवाच्या आकांताने घराकडे पळाले; परंतु रामजी जखमी झाल्याने पळू शकला नाही. हत्ती मारून टाकेल या भीतीने ताे जवळच असलेल्या एका झाडावर चढला. याचवेळी हत्तीच्या ओरडण्यामुळे त्याला भीती वाटत हाेती. भीतीमुळे त्याची दातखिळी बसली. त्यामुळे त्याचे ओरडणेसुद्धा बंद झाले व रात्रभर ताे झाडावर चढून राहिला.अन् काठी टेकत-टेकत रामजी परतलासात मजूर गावात परतले; परंतु रामजी घरी आले नाही म्हणून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची शाेधाशाेध सुरू केली; परंतु रामजीचा पत्ता लागला नाही. दातखिळी बसल्यामुळे रामजी बाेलू शकला नाही. त्यामुळे गावकरी घरी परतले. परंतु दुसऱ्या दिवशी रामजी काठी टेकत-टेकत घरी परतला. यााबबत माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी रामजीला जखमी अवस्थेत धानाेरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले.