गडचिराेली : धानाेरा तालुक्यातील कटेझरी पाेलिस मदत केद्रांतर्गत येणाऱ्या चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेल्या स्फाेटकांसह इतर साहित्य पाेलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई १४ फेब्रुवारी राेजी करण्यात आली.
चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांवर घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य जंगलात पुरून ठेवले असल्याची गाेपनीय माहिती गडचिरेाली पाेलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस दल व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्याचा साठा आढळून आला.
२ नग जिवंत ग्रेनेड, २ नग ग्रेनेड फायर कफ, १८ नग वायर बंडल, ५ ब्लास्टिंग स्टिल डब्बे, १ प्लास्टिक डब्बा, ४ नग वायर कटर, ७ नग ग्रेनेड माउंटिंग प्लेट, १ नग लहान लोखंडी आरी, २० नग नक्षल पुस्तके, ७ टू-पीन सॉकेट, १ स्टील डब्बा झाकण व २ नग पाॅलिथिन आदी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. २० नग ग्रेनेड हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात पोमके कटेझरीच्या जवानांनी यशस्वीरीत्या पार पाडली.