लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी :गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसतो. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. पशुधनाची जीवितहानी होते.
आष्टीजवळून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र फार मोठे आहे. या नदीलगत कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, चपराळा, गणपूर, आष्टी, अनखोडा आदी गावे आहेत. मध्य प्रदेशात आलेल्या पावसाचे पाणी संजय सरोवर व गोसेखुर्द धरणात साठवून ठेवले जाते. धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात अर्धी भरून असलेल्या वैनगंगा नदीला लवकरच पूर येतो. आष्टीजवळच्या पुलावर ५ फूट पाणी वाढल्यास पुराचे पाणी कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, गणपूर, चपराळा आदी गावांतील शेतात शिरते. त्यामुळे धानाचे पीक पूर्ण पाण्याखाली येत असल्याने धान सडून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.
आष्टीच्या विश्रामगृहाजवळील शेती पाण्याखाली येते. वैनगंगेच्या पुराच्या दाबामुळे अनखोडा नाल्यावर पाणी चढते. त्यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतात पाणी भरून राहते. त्यामुळे या परिसरातील धान, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.