लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पीएम किसान सन्मान याेजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्याची मुदत ३१ मेपर्यंत हाेती. मात्र आता शासनाने तब्बल दाेन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. सुरुवातीच्या कालावधीत पीएम किसान याेजनेची साईट व्यवस्थित काम करीत नसल्याने केवायसी करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू हाेते. मे महिन्यात मात्र अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र काही शेतकरी अजूनही शिल्लक आहेत. देशभराचा विचार करत शासनाने मुदतवाढ दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी साेयीचेसुरूवातीला ३१ मार्चपर्यंत केवायसीची मुदत हाेती. त्यानंतर ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली. पुन्हा आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.
१ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना लाभजिल्ह्यात १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ दिला जात आहे. नाेंदणीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे, पाेलीस विभागाच्या वतीने शिबिर घेऊन नाेंदणी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी या याेजनेचे लाभार्थी हाेत आहेत.
केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत
अनेक शेतकऱ्यांच्या आधारकार्डासाेबत माेबाईल क्रमांक लिंक नाही. त्यामुळे त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायाेमेट्रिक केवायसी करावी लागत आहे. त्यासाठी शहरात जावे लागत आहे. काहीजणांचे अंगठे जुळत नसल्याने ई-केवायसी करण्यात फार माेठी अडचणी येत आहे. - रघुनाथ बारापात्रे, शेतकरी
केवायसी करूनही काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या याेजनेबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडते. त्यामुळे काही शेतकरी अजुनही या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तालुकास्तरावर कर्मचारी नियुक्त करावे. - वासुदेव शेंडे, शेतकरी
४० टक्के शेतकऱ्यांची केवायसी नाहीदुर्गम भागातील शेतकऱ्यांना अजूनही ई-केवायसीबाबत माहिती नाही. तसेच मध्यंतरी साईट बंद असल्याने ई-केवायसी करणे शक्य नव्हते. जिल्ह्यात एकूण १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांची नाेंदणी झाली आहे. त्यापैकी ३१ मेपर्यंत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे.