चामोर्शी (गडचिरोली) : मित्रांसोबत वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला कुनघाडा रै. येथील युवक करण गजानन गव्हारे (वय २५) हा १३ नाेव्हेंबर राेजी सकाळी ११:३० वाजता कुनघाडा रै. ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर बुडाला. त्याची शाेधमाेहीम सायंकाळपर्यंत सुरू हाेती; परंतु युवकाचा शाेध लागला नाही. दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) सुद्धा करणचा शाेध घेण्यात आला; परंतु शाेध लागला नाही.
करण गव्हारे हा अन्य १० वर्गमित्रांसाेबत कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेला हाेता. आंघाेळ करत असताना तीन युवक नदीपात्रातील नाव चालविण्यात मग्न होते. नाव पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेली. ती बुडण्याच्या स्थितीत असताना तिन्ही युवक पाण्याखाली उडी मारून बाहेर येत हाेते; मात्र, एक मित्र बुडत असल्याचे समजताच पाण्याबाहेर असलेल्या करणने पाण्यात उडी घेतली. ताे प्रवाहाच्या दिशेने गेला, मात्र त्याला पाण्याच्या खाेलीचा अंदाज आला नाही व तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील दिलीप श्रुंगारपवार, तलाठी नितीन मेश्राम, कोतवाल नेताजी वाघाडे व नातेवाईक हजर झाले. पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन चमूने शोधमोहीम राबविली. दुसऱ्याही दिवशी ही माेहीम राबविण्यात आली; परंतु करणचा शाेध लागला नाही.