लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र अहेरी येथे सुरू करण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या अर्थसंकल्पिय अधिसभेत सोमवारी मान्यता देण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही सभा चालली. यात ५३.४८ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी सादर केला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत सदस्यांनी तो मंजूर केला.यावेळी विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली.गोंडवाना विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राबविण्यासंदर्भात प्रस्ताव होता. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्याबाबतच्या प्रस्तावाला कुलगुरूंनी मान्यता दिली.व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. संचालन अधिसभा सदस्य सचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले.
कुलगुरूंनी सांगितले काँक्रिटीकरणाचे दुष्परिणाम
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, सर्वत्र होत असलेले काँक्रिटीकरण आणि त्यामुळे पावसाच्या पाण्याची होणारी नासाडी, त्यामुळे पाणीटंचाई सारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा-पाणी जिरवा हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि त्यामुळे पाणी जमिनीत मुरेल. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून नदीतली माती आपण उपसून घेणार आहोत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरेल आणि त्याचा फायदा नद्या, विहिरी, बोअरवेल्स यांची पातळी वाढेल, असे सांगत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली.
गोंडी, माडिया भाषा विभाग सुरू होणारगोंडवाना विद्यापीठात गोंडी, माडिया व इतर जनजातीय भाषा विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावाला मान्यता देताना कुलगुरू म्हणाले, गोंडी आणि माडिया भाषेला स्वतःची लिपी आहे. भाषाशास्त्र विषयांमध्ये गोंडी आणि माडिया भाषा सुरू केल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.
राष्ट्रसंत आणि शिवाजी महाराज केंद्रगोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत मागणी होती. या बैठकीत त्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. त्यामुळे लवकरच यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.