लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली विधानसभा : निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे. २६ व २७ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश असून क्षेत्रात ३६२ मतदान केंद्र असून, एकूण १ हजार ८१९ मतदान अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली आहे. प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य जाणून घेतले.
प्रशिक्षण स्थळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी अमित रंजन, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, गडचिरोलीचे नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान, अनिल सोमनकर, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.