मनोज ताजने
गडचिरोली : जुना तांदूळ असेल तर तो अधिक चांगला शिजतो; त्यामुळे त्याचे दरही नवीन तांदळाच्या तुलनेत जास्त असतात; पण भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) नियमांनुसार चांगल्या तांदळाचे वय अवघे तीन महिने निश्चित करण्यात आले आहे. राईस मिलर्सकडून भरडाई करून आलेला तांदूळ तीन महिन्यांपेक्षा जुना असल्यास तो सरळ ‘रिजेक्ट’ केला जात असल्यामुळे या वर्षी भरडई केलेले धानाचे लॉट नापास करण्याचे प्रमाण वाढले आहे.
राज्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. याच भागातून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना एफसीआयमार्फत तांदळाचा पुरवठा होतो. या वर्षी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससोबत करारनामे करून भरडाई सुरू आहे; पण मिलर्सच्या अडेलतट्टू धोरणामुळे सध्या गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धान भरडाई अत्यल्प प्रमाणात झाली आहे. भरडाईस होत असलेल्या या विलंबासोबत तांदळाचे लॉट नापास होण्याचे प्रमाणही वाढणार आहे. कारण केमिकल टेस्टनुसार भरडई झालेल्या तांदळाची तपासणी केली जात आहे.
अशी होते केमिकल टेस्ट
आधी भरडई केलेल्या तांदळात तुकड्याचे प्रमाण किती आहेत, हे तपासून लॉट पास केले जात होते. आता तुकड्यासोबतच केमिकल टेस्ट करून तांदूळ किती जुना आहे, हेसुद्धा तपासले जाते. प्रत्येक लॉटमधील ५ ग्रॅम तांदूळ काढून त्यात लिक्विड केमिकल टाकले जाते. त्यानंतर तांदळाचा रंग हिरवा आल्यास तो तांदूळ नवीन आहे, हे सिद्ध होऊन तो स्वीकारला जातो; पण तांदळाचा रंग पिवळा आल्यास तो तांदूळ ३ महिन्यांपेक्षा जुना आहे, असे मानून तो नाकारला जातो.
तीन महिन्यांत भरडाई अशक्य
शेतकऱ्यांकडील धानाची शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी आता जवळपास ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे; पण लाखो क्विंटल धान अजूनही शासकीय गोदामांमध्ये आणि खरेदी केंद्रांवर भरडाईच्या प्रतीक्षेत उघड्यावर ठेवलेला आहे. धान भरडाईची संथगती पाहता तीन महिन्यांतच काय, सहा महिन्यांतही सर्व धानाची भरडाई होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत एफसीआयच्या निकषांत तो धान बसेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.