दिगांबर जवादे
गडचिराेली : सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या कारला आग लागली. या आगीत सुगंधित तंबाखूसह कार जळून खाक झाली. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काेरची शहरातील तहसील कार्यालयाजवळील बायपास रोडवर घडली.
छत्तीसगड राज्यातून काेरची मार्गे (एमएच ३५, एजी ७००१) क्रमांकाच्या कारने सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात हाेती. दरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे काेरची शहराजवळ कारला अचानक आग लागली. या कारमध्ये चालक व साेबत एकजण बसला हाेता, अशी प्राथमिक माहिती आहे. कारमध्ये सुगंधित तंबाखू असल्याने कारमधील व्यक्तींनी याची माहिती पाेलिसांना दिली नाही. कारमधील सुगंधित तंबाखू काही प्रमाणात बाहेर काढला व घटनास्थळावरून पळून गेले.
अगदी रस्त्याच्या कडेला कार जळत हाेती. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी याची माहिती काेरची पाेलिसांना दिली. पाेलिसांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ताेपर्यंत कार जळून खाक झाली. आग विझल्यानंतर कारची तपासणी केली असता, त्यात काही प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळला. कारमालक व त्यातून सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारे यांचा शाेध पाेलिस घेत आहेत.