गडचिरोली: दक्षिण गडचिरोलीत धुमाकूळ घालत दोन महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला पकडण्यात अखेर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रॅपिड रिस्पॉन्स टीमला यश आले. १८ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही जंगलात या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलच व्याघ्र हल्ल्यांचे सत्र सुरु झाल्याने जिल्हा हादरुन गेला. ३ जानेवारीला गडचिरोलीजवळील वाकडी जंगलात एका महिलेचा वाघाने बळी घेतला. त्यानंतर दक्षिण गडचिरोलीतील ७ जानेवारी रोजी सुषमा देवदास मंडल(५५,रा. चिंतलपेठ) व १५ जानेवारीला रमाबाई शंकर मुंजनकर (५५,रा. कोळसापूर) या दोन महिलांवर शेतात काम करताना वाघिणीने हल्ला केला. दोघींचाही मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जनतेतील रोष पाहून वनविभागही जोमाने कामाला लागला होता. वाघिणीला पकडण्यासाठी ताडोबा- अंधारी प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ.रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखालील ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ला पाचारण केले होते. दोन दिवस या वाघिणीने चमूला हुलकावणी दिली. वाघिणीला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. एका कॅमेऱ्यात ती आढळली. १८ रोजी रात्री चमूने डॉट इंजेक्शनने तिला बेशुध्द केले व नंतर पिंजऱ्यात टाकून वनविभागाच्या कार्यालयात नेले. तेथून तिला ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात येणार आहे. डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यासह शूटर पोलिस नाईक अजय मराठे, दीपेश टेंभुर्णे, वसीम शेख, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, विकास ताजने, प्रफुल्ल वाटगुरे, ए. डी. कोरपे, वाहनचालक, ए. एम. दांडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
६३ वी कारवाईदरम्यान, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रॅपिड रिस्पॉन्स टीमने यापूर्वी ठिकठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या तब्बल ६२ वाघांना जेरबंद केले होते. रेंगेवाहीत पकडलेली वाघीण ६३ वी आहे. या वाघिणीचे वय अंदाजे अडीच वर्षे आहे, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.