गडचिराेली : वडसा व गडचिराेली वन विभागात गेल्या पाच महिन्यांत १० लाेकांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ताडाेबाचे पथक अहाेरात्र माग घेत आहे; परंतु वारंवार ही वाघीण पथकाला हुलकावणी देत आहे. २२ जानेवारी राेजी नरभक्षक वाघीण अन्य एका वाघिणीसह नर वाघासाेबत राजगाटा परिसरातील कंपार्टमेंट नं. ४१३ व ४१५ मध्ये कॅमेराबद्ध झाली. कॅमेऱ्याने तिला टिपले असले तरी तिचे दाेन बछडे कुठे आहेत, असा प्रश्न घाेळका करीत आहे.
दाेन वन विभागातील दाेन तालुक्यांच्या लाेकांमध्ये नरभक्षक वाघिणीने वावर ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जेरबंद करण्यासाठी व तिच्यावर देखरेखीसाठी वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये ती अधूनमधून दिसते. मात्र, पथकाला गवसत नाही. आतापर्यंत वाघिणीने पाच महिला व पाच पुरुषांचा बळी घेतला आहे, तेव्हापासूनच वाघिणीला पकडण्यासाठी ताडाेबाची चमू गडचिराेली तालुक्यातील राजगाटा व अमिर्झा परिसरातील जंगल हुडकून काढत आहे. विशेष म्हणजे, जंगलात पथकाला गस्त घालण्यासाठी साेपे व सुकर व्हावे यासाठी जंगलातील विविध जुने रस्ते साफसूफ केले आहेत.
सध्या शिकार सापळे किती?
गडचिराेली तालुक्यातील राजगाटा, आंबेटाेला व दिभना परिसरात वन विभागाने सध्या ४ शिकार सापळे (बेट) लावले आहेत. विशेष म्हणजे, गडचिराेली तालुक्यासह आरमाेरी तालुक्यातील कुरंझा परिसरात आतापर्यंत ३० बेट वन विभागाने लावले. यापैकी बरेच बेट वेगवेगळ्या वाघांनी फस्त केले.
कॅमेऱ्याने टिपलेले वाघ काेणते?
वन विभागाने राजगाटा, दिभना परिसरात ८० कॅमेरे लावले आहेत. सदर कॅमेऱ्यांमध्ये अधूनमधून वाघीण व अन्य वाघ कॅमेराबद्ध हाेतात. २२ जानेवारी राेजी कॅमेऱ्याने टी-६ व जी-२ वाघीण, जी-१० वाघ (नर) टिपला. विशेष म्हणजे, याच जंगलात जी-१ या नर वाघाचासुद्धा वावर आहे. टी-६ वाघीण वगळता अन्य वाघ दिभनाच्या जंगलात ये-जा करतात.
जेरबंद करण्यासाठी अडचणी काेणत्या?
नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ताडाेबातून आलेली डाॅ. रविकांत खाेब्रागडे यांची चमू वाघ पकडण्याच्या कामात तरबेज आहे. सदर टीमने आतापर्यंत ५१ वाघ पकडले आहेत; परंतु टी-६ वाघीण पकडण्यात सदर टीमला अपयशच येत आहे. टी-६ वाघीण अत्यंत लाजरी असून ती बुजाडणारी आहे. बेट मारल्यानंतर ती पुन्हा त्या ठिकाणी येते; पण दचकतच. परिणामी तिला जेरबंद करण्यासाठी चमूला अडचणी येतात.