एटापल्ली/ गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे रस्ता व प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला २२ दिवस उलटले; पण अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आता परिसरातील ग्रामसभांनी साखळी पद्धतीने आंदोलन सुरू केले असून रोज एका गावचे लोक आंदोलनस्थळी ठिय्या देत आहेत. या आंदाेलनाचे काय हाेणार, याकडे लक्ष लागले आहे.
दमकोंडीवाही बचाव कृती समिती व पारंपरिक सूरजागड इलाका समितीच्या नेतृत्वाखाली तोडगट्टा येथे १३ मार्चपासून आंदोलन सुरू आहे. आदिवासी हेच जंगलांचे वैधानिक व कायदेशीर हक्कदार आहेत. त्यामुळे ग्रामसभेच्या मागणीनुसार कामे करावी, मागणीशिवाय होऊ घातलेली कामे बंद करावीत, असा निवेदनात उल्लेख आहे. दरम्यान, ३ एप्रिलला या आंदोलनास २२ दिवस झाले. अद्यापही आंदोलक ठाम आहेत. रमेश कवडो, सैनू गोटा, नितीन पदा, लक्ष्मन नवडी, प्रदीप हेडो, सैनू हिचामी, सुशील नरोटी, सविता कौशी, सुनीता कवडो, शीला गोटा यांच्यासह ग्रामसभेचे पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थ आंदोलनात सहभागी आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही
यासंदर्भात जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, हे आंदोलन विकासविरोधी आहे. आंदोलन बेकायदेशीर व विनापरवाना आहे. तेथे कायदा- सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी काय करता येईल, याबाबत विचार सुरू आहे.
आंदोलनात आतापर्यंत काय?
- २६ मार्चला शहीद दिनानिमित्त आंदोलनस्थळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी छत्तीसगड ग्रामसभेचे लोकही उपस्थित होते.
- २७ मार्चनंतर मुखिया व गाव पाटील यांना आंदोलनात सहभागी होण्याची पत्रके मिळाली. ही पत्रके नक्षल्यांनी पाठविल्याचा पोलिसांना संशय आहे.
... म्हणून आदिवासींचा विरोध
सूरजागड येथील लोहखाणीमुळे प्रदूषणासह रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अवजड वाहनांमधून रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्याने अपघात होत आहेत, त्यास स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. ग्रामसभेच्या ठरावाशिवाय व अनुसूचित क्षेत्र असतानाही नव्याने सहा खाणी कशासाठी, असा सवाल आंदोलक उपस्थित करत आहेत.
संविधानाने ग्रामसभेला दिलेल्या अधिकाराचा भंग करून खाणींना मंजुरी देण्यासाठी रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष का दिले जात नाही. प्रशासनाने अंत न पाहता तोडगा काढावा.
- सैनू गोटा, सूरजागड इलाका प्रमुख तथा माजी जि.प. सदस्य, गट्टा