गडचिरोली: जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या बिनागुंडा परिसरात कुठेही जायचे असेल तर नागरिकांना गुंडेनूर नाला पार करावा लागतो. हा नाला नदीएवढा मोठा असला तरी, त्यावर शासनाने पूल अद्याप बांधलेला नाही. या नाल्याला वर्षभरात किमान सात ते आठ महिने भरपूर पाणी असते. नाल्यावरून वाहतूक करण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी बांबू व लाकडाच्या सहाय्याने एक पूल बांधला आहे.
शहरी भागातील नागरिकांसाठी हा पूल पर्यटनाचा विषय ठरतो आहे. बिनागुंडाच्या धबधब्यापूर्वी हा पूल येतो. धबधबा पहायला येणारे पर्यटक आधी या पुलावर बसून आनंद लुटतात व नंतर पुढचा प्रवास सुरू करतात.