लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गिधाड पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी गडचिरोली वनवृत्तातर्फे नऊ वर्षांपूर्वी गिधाड उपाहारगृह उभारले होते. तेव्हा जिल्ह्यात गिधाडांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. दोन ते तीन वर्षे गिधाडांचे संवर्धन झाले; त्यानंतर वन विभागाने दुर्लक्ष केल्याने गिधाडांची संख्या झपाट्याने घटली.
गिधाडांसाठी उपहारगृहांची सोय असताना वेगवेगळ्या भागात गिधाडांचा वावर असायचा. ही संख्या २०० च्या आसपास पोहोचली होती. गडचिरोली वन विभागात १०० हून अधिक गिधाडे होती. एकट्या गडचिरोली विभागात गिधाडांसाठी पाच उपाहारगृहे निर्माण केली होती. ही सर्वच उपाहारगृहे आता बंद आहेत. गडचिरोली- धानोरा मार्गावर चार किमी अंतरापर्यंत गिधाड संवर्धनाचे फलक गडचिरोली वन विभागाने लावले होते. आता गिधाडांचे संवर्धनच होत नसल्याने हे फलक देखावा ठरत आहेत.
मृत जनावरेही मिळेनात जनावरे म्हातारी झाली की त्यांची कसायाला विक्री केली जातात. आता पशुपालकही पशुधन घरी मरू देत नाहीत. गिधाडांना मृत जनावरे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गिधाड काय खाणार, असा प्रश्न आहे. त्यातच वन विभागाने तर गिधाडांचे उपाहारगृहसुद्धा बंद केले.
पक्षीमित्रांमध्ये नाराजीगडचिरोली वन विभागात २१ गिधाड मित्र नेमून त्यांच्यावर उपाहारगृह चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मृत जनावरे येथे आणून टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ही उपाहारगृह बंद केल्याने गिधाडांना अन्न मिळणे बंद झाले. गिधाड मित्रांचाही रोजगार गेला.
जिल्ह्यात पाच ठिकाणी होते उपहारगृहजिल्ह्यात पांढऱ्या पाठीचे, लांब चोचीचे, हिमालयीन, काळे गिधाड आदींचा समावेश होता. यापैकी काळे गिधाड आकाराने सर्वात मोठे असून पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातच आढळले होते. गडचिरोली तालुक्यातील माडेतुकूम- बोदली, मुडझा, मारकबोडी, चामोर्शी तालुक्यातील मालेरमाल व कुनघाडा रै.. सिरोंचा तालुक्यात एक उपाहारगृह निर्माण केले होते.