अरविंद घुटकेलाेकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात भाजीपाला व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. ही सर्व पिके फक्त विद्युत पंपाच्या भरोशावरच घेतली जातात. परंतु शासनाने भारनियमन लागू केले आहे. परिणामी पुरसे पाणी देणे शक्य नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी तीव्र असंताेष निर्माण झाला आहे.भाजीपाला पिकांची नुकतीच लागवड झाली हाेती, तर काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवडा दिवसा, तर दुसऱ्या आठवड्यात रात्री विद्युत देणे सुरू असल्याने रात्री-बेरात्री बांधावर जावून पाणी करणे अनेकांच्या जीवावर येत आहे. मजुरांची वाणवा असल्याने काही शेतकरी पत्नीसह रात्र जागून पिकांना पाणी देत आहेत. यात फार मोठा धोका होण्याची संभावना शेतकरी बोलून दाखवित आहेत. कारण या भागात जंगली श्वापदांचा वावर असल्याने जीवास धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन भारनियम बंद करण्याची मागणी हाेत आहे.
अनेकांची वीज कापली - कृषिपंपाचे वीजबिल भरले नाही. या कारणास्तव अनेकांची वीज कापण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांवर २० ते ४० हजार रुपयांचे वीजबिल थकित आहे. पीक निघाले असते तर हे बिल भरणे शक्य झाले असते, मात्र आता वीजच नसल्याने पीक करपत चालले आहे. झालेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. पीक करपल्यास वीजबिल भरणार कसे? असा प्रश्न आहे.