लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने खासगी कंत्राटदारांमार्फत शासनाच्या विविध याेजनांतून लहान-माेठी अशी दाेन काेटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आल्यापासून कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनासह कंत्राटदारांची धडपड सुरू आहे. गडचिराेली नगरपालिका प्रशासनाला नगराेत्थान, वैशिष्ट्यपूर्ण ठक्करबापा दलितवस्ती विकास, रस्ते अनुदान आदी याेजनांतून दरवर्षी लाखाे रुपयांचा निधी उपलब्ध हाेत असताे. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२२ राेजी संपणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामांची मुदतही ३१ मार्च २०२२ अशी आहे. विविध याेजनांतर्गत संरक्षक भिंत, रस्ते, नाली, तसेच इतर इमारतींची कामे चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने कंत्राटदारांना दिले आहेत.जिल्हा मुख्यालय स्तरावर असलेल्या गडचिराेली नगरपालिकेला शासनाकडून गेल्या दाेन वर्षांत काेट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तब्बल ९८ काेटी रुपयांच्या भूमीगत गटार याेजनेचे काम गडचिराेली शहरात सुरू आहे. या याेजनेचे बरेचशे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. नगरपालिकेचे प्रशासक सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात शहरात गेल्या महिनाभरापासून विकासकामांनी गती घेतली आहे.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा झाली अलर्ट - गडचिराेली नगरपालिकेच्या स्थानिक बाॅडीची मुदत संपली आहे. आता पालिकेचा कारभार पदाधिकारी व नगरसेवकांच्या हातात नाही. आयएएस दर्जाच्या प्रशासकांच्या हाती पालिकेचा कारभार आल्यापासून नगरपालिकेची यंत्रणा गतिमान झाली आहे. कर वसुलीपासून सर्वच कामे खबरदारीने व जलद गतीने हाेत आहेत.
ही आहेत माेठी कामेनगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या विविध वाॅर्डांत रस्ते, नाली, छाेटे पूल आदींसह ओपन स्पेसचे काम सुरू आहे. याशिवाय चार ते पाच माेठी कामे सुरू असून, त्याची किंमत लाखाच्या घरात आहे. यामध्ये चंद्रपूर मार्गावरील नगर भवनाच्या आतमध्ये फायर ब्रिगेड स्टेशनचे काम सुरू आहे. नगर परिषद कार्यालयासभाेवताल संरक्षक भिंत तसेच खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सभाेवताल संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे.