गडचिराेली : ज्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून वनहक्क पट्टे मिळाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांनी अजूनही केली नाही. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहे. वनहक्क पट्टे मिळालेल्या सातबाराधारक शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी येत्या १० दिवसांत सुरू करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धानाच्या पाेत्यांसह ट्रॅक्टर ट्राली माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा जि.प.चे माजी सदस्य तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी प्रशासनाला दिला आहे.
सातबारा मिळालेले वनहक्कधारक शेतकरी धान विक्रीसाठी केंद्रावर गेले असता, त्यांना केंद्रावरून परत पाठविले जात आहे. धान विकल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. दुसरीकडे ज्यांचे पैसे शेतकऱ्यांकडे आहे ते पैसे वसुलीसाठी तगादा लावत आहेत. शेतकऱ्यांनी सुरेंद्रसिंह चंदेल यांची भेट घेऊन ही समस्या त्यांना सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ठाेस निर्णय घेऊन वनहक्क पट्टेधारक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी चंदेल यांनी केली आहे.