लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाची प्रसारसाखळी खंडित करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर केलेले ‘लॉकडाऊन’ पुढेही वाढविले जाऊ शकते. मात्र दि.१४ पर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळणार नाही त्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीत शिथिलता देऊन जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.सध्या अत्यावश्यक सेवेशिवाय दुसरे काहीच सुरू नाही. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सीमा पार करण्यावरही बंदी आहे. परंतू दि.१४ पर्यंत ज्या जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळणार नाही त्या जिल्ह्यांमध्ये अंतर्गत वाहतुकीसोबतच कोरोनाचा रुग्ण नसणाºया लगतच्या दोन-तीन जिल्ह्यात आंतरजिल्हा वाहतूकही सुरू होऊ शकेल, असे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या गोरगरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरू करण्याआधीच राज्य सरकारने संचारबंदी लागू करून कोरोनाविरूद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे टाकले होते. या राष्ट्रीय आपत्तीत राज्याने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. पण ते देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळी-थाळी वाजविणे, दिवे लावण्यासारखे उपाय सांगत आहे हे योग्य नसल्याची टिका त्यांनी केली.
पीएम केअर फंड कशासाठी?कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी देशातील अनेक उद्योगपतींनी कोट्यवधी रुपये दिले. पण ते पैसे थेट पंतप्रधान मदतनिधीत जाण्याऐवजी ‘पीएम केअर फंड’ या नावाने सुरू केलेल्या नवीन ट्रस्टकडे दिले जात आहेत. खासगी संस्थेप्रमाणे त्या ट्रस्टवर भाजप, संघाचे लोक आहेत. मोदींची ही कृती संशयास वाव देणारी असून या ट्रस्टच्या माध्यमातून मदतनिधीचा योग्य विनियोग लागेल का? अशी शंका ना.विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली.