लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानाचे पीक निघाले असून, रब्बी पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून घेण्यासाठी महावितरण व मेडाकडे तगादा लावला आहे. मात्र विविध कारणे सांगून कंपन्या सौर कृषिपंप लावून देण्यास विलंब करीत आहेत. त्यामुळे रब्बी पिकांचा हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाने मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मंजूर केले आहेत. अर्ज स्वीकारणे व मंजूर करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याने पैसे भरून एजन्सी निवडायची असते. जी एजन्सी निवडली त्याच एजन्सीने सौर कृषिपंप लावून देणे गरजेचे आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत सौर कृषिपंप लावून देण्यास एजन्सी तयार होत्या. मात्र अनेकांच्या विहिरीजवळ जाणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात पंप लावण्यास सांगितले. पंप लावून देण्यासाठी आता अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे पंप लावून देताना कंपनीच्या एजंटची तारंबळ उडत आहे. आता रब्बीच्या पिकांची पेरणी सुरू झाली आहे. पुन्हा जास्तीत जास्त १५ दिवस पेरणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून जाणार आहे. सौर कृषिपंप न बसल्याने रब्बीची पेरणी शक्य होणार नाही. अचानक मागणी वाढली हे जरी खरे असले तरी कंपन्यांनी पंप लावणाऱ्या मजुरांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
निवडणुकीचे कारण विधानसभेची निवडणूक असल्याने सौर कृषीपंपाबाबतच्या काही प्रशासकीय बाबी पूर्ण होण्यास उशीर लागत असल्याचे कारण सांगीतले जात होते. आता मात्र निवडणूक संपली आहे. उर्वरीत अर्ज मार्गी लागतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.