लाभार्थ्यांची उदासीनता चव्हाट्यावर : शासनाकडून प्रशासनाची कान उघाडणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : घर नसलेल्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने घरकुलाच्या पाच ते सहा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे गडचिरोली जिल्ह्यात सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या तीन वर्षाच्या कालावधीत इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले तब्बल ८ हजार ६२६ घरकुले अद्यापही अपूर्ण स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे अनुदानापोटी कोट्यवधी रूपये जिल्ह्याला देऊनही घरकूल बांधकामात जिल्हा माघारला आहे. त्यामुळे शासनाकडून प्रशासनाकडे सातत्याने विचारणा होत असून कानउघाडणीही केली जात आहे. सन २०१२-१३ वर्षापूर्वीचेही विविध शासकीय योजनांचे हजारो घरकूल अपूर्ण स्थितीत आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी घरकूल, आदिम जाती घरकूल व राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना आदी योजनांची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत मंजूर झालेले काही घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी कमी आहे. विविध शासकीय योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात हजारो घरकुले अपूर्ण स्थितीत असून तीन ते चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले घरकूल काही लाभार्थ्यांनी घरकुलांचे काम अद्यापही सुरू ठेवले आहे. शासकीय योजनांमधून मंजूर झालेले सर्व घरकुलांचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र व राज्य सरकारने जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात घरकुलाच्या बांधकामाने गती घेतली नाही. कार्यशाळेतून होणार जागर इंदिरा आवासासह इतर सर्व शासकीय योजनेतून मंजूर करण्यात आलेले व सद्य:स्थितीत अपूर्ण असलेले घरकुलांचे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी बाराही तालुकास्तरावर घरकूल लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी २० मे २०१७ रोजी सर्व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना महत्त्वाचे पत्र पाठविले आहे. कार्यशाळेत या विषयावर होणार विस्तृत चर्चा पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या कार्यशाळेत घरकूल बांधकामासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांकडून बांधकामाची अद्यावत स्थिती नोंदवून घेणे, लाभार्थ्यांकडून बांधकाम पूर्ण करावयाचा दिनांक ठरवून त्याची नोंद करणे, लाभार्थ्यांसोबत झालेल्या करारनाम्याचे महत्त्व पटवून देणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे अंदाजपत्रक, बांधकाम याबाबत माहिती देणे, बांधकाम कशा प्रकारे करावे, याबाबत माहिती देणे, ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांना सर्व प्रकारचे अपूर्ण व नवीन घरकुलाची यादी देऊन पोच पावती देणे, ग्राम पंचायतनिहाय मार्च २०१८ पर्यंत घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशा प्रकारचे नियोजन करणे आदींचा समावेश आहे. ३१ मे व २ जूनला होणार कार्यशाळा भामरागड, गडचिरोली, आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली व देसाईगंज या ११ तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये ३१ मे बुधवारला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तर मुलचेरा पंचायत समितीमध्ये २ जून रोजी घरकूल लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेला बीडीओ, अभियंता व ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यात तब्बल ८ हजार ६२६ घरकुले अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 1:22 AM